दिव्यांगांकडे खासदारांनी फिरवली पाठ

| पेण | प्रतिनिधी |

येथील आगरी विकास समाज सभागृहात पेण पंचायत समितीतर्फे दिव्यांग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार सुनिल तटकरे यांनी पाठ फिरवल्याने सर्वांचीच घोर निराशा झाली.

केंद्र शासनाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत व भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम (अलीम्को) यांच्यातर्फे दिव्यांगाना आवश्यक उपकरणे या कार्यक्रमात देण्यात येणार होते. खासदारांनी दांडी मारल्याने आयोजकांची चांगलीच अडचण झाली. मात्र, आयत्या वेळी स्थानिक आमदार रविंद्र पाटील यांना पाचारण करण्यात आले. आमदार पाटील यांनी याबाबत कोणतीच नकार घंटा वाजवली नाही. ते कार्यक्रमाला हजर झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील तटकरे उपस्थित राहणार असल्याचे कार्यक्रमाचे फलक व निमंत्रण पत्रीकेमध्ये जाहीर केले होते. खासदार उपस्थित राहणार म्हणून पेण पंचायत समितीकडून मोठया संख्येने दिव्यांग हजर राहावेत म्हणून विशेष काळजी घेतली होती. या शिबीरामागचा उद्देश ज्या दिव्यांगाना उपकरणांची गरज आहे त्या दिव्यांगानांच बोलवणे होते, परंतू खासदारांसमोर भरगच्च कार्यक्रम वाटावा म्हणून मोठ्या संख्येने दिव्यांगांना बोलवण्यात आले होते. यासाठी बहुतांश ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना आयोजकांनी तंबी दिल्याचे बोलले जाते.

दिव्यांग सकाळी 9 वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी हजर होते. परंतू, नियोजनाच्या अभावामुळे गोंधळच पहायला मिळाला. त्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपले साहेब येतील म्हणून बाहेर स्वागतासाठी जय्यत तयारीत उपस्थित होते. परंतू, खासदार येत नाही हे समजताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे नौ दो ग्यारह झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊ साहेब पोळ यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार रविंद्र पाटील, तहसीलदार प्रसाद कालेकर, पेण नगरपालिकेचे अमोल पाटील, दिव्यांग संघटनेचे भालचंद्र भगत, अखील पठाण, ॲड. सचिन गायकवाड, विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Exit mobile version