न.प.चे तक्रारीकडे दुर्लक्ष; मंदाकिनी कासेकर यांचे उपोषण

| आगरदांडा | प्रतिनिधी |

नगरपरिषदेकडे लेखी तक्रार करुनसुद्धा नगरपरिषदेने या तक्रारीची दखल न घेतल्याने या अन्यायाविरोधात मुरुड शहरातील कोळीवाडा येथील मंदाकिनी कासेकर यांनी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोरील प्रांगणात उपोषण सुरू केले आहे. यावेळी मुरुड तालुक्यातील भाजपचे तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर, शैलेश खोत, प्रवीण बैकर, महेश मानकर, सुधा वाघीलकर, धनेश गोगर, गणेश कट, शेषनाक कानगोजे, हरिष पाटील आदींनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे.

सविस्तर असे आहे की, मुरुड नगरपरिषदेचा मासळी मार्केटमधील कर गोळा करण्याचा ठेका कायदेशीर सर्व बाबी पूर्ण करून शहरातील मंदाकिनी कासेकर यांना देण्यात आला होता. सदरील ठेका मंजूर झाल्यावर त्याची रक्कमसुद्धा त्यांनी मुरुड नगरपरिषदेकडे भरली होती. परंतु, मच्छीमार्केट येथे कर गोळा करताना मासळी विकण्यास येणार्‍या काही महिला कर पावती रक्कम भरण्यास विरोध करीत असून, त्याबरोबर सतत दमदाटी व शिवीगाळ करीत असतात. अशा परिस्थितीत ठेक्याचे पैसे कसे जमा करायचे, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाल्याने याबाबत मुरुड नगरपरिषदेकडे चार वेळा अर्ज केला, परंतु, कोणतीही कारवाई नगरपरिषदतर्फे करण्यात आलेली नाही. यामुळे त्या महिलांचा जोर अजून वाढला असून, यात माझे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या अन्यायविरोधात उपोषणाला बसणार याबाबत मुरुड तहसीलदार, मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, मुरुड पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार आजपासून उपोषणाला सुरुवात केल्याचे कासेकर यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मी मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांना लवकरच हा विषय निकाली काढून टाका, अशी सूचना दिली आहे. यावेळी शिवसेनाच्या जिल्हा संघटिका  शुभांगी करडे यांनी या उपोषणाला जाहिर पाठिंबा दर्शविला आहे.

Exit mobile version