उरणमध्ये पाणीसाठा वाढीकडे दुर्लक्ष

वर्षाला चार हजार दशलक्ष लिटर पाण्याच्या तुटवडा
| उरण । वार्ताहर ।
उरणमधील रानसई धरणाची निर्मिती होऊन 60 ते 65 वर्षे झाली असून त्यानंतर लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणातही प्रचंड वाढ झाल्याने त्या पटीने पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र 50 वर्षांपूर्वीचाच पाणीसाठी आजही कायम आहे. धरण गाळाने भरल्याने उलट त्यात मोठी घट झाली आहे, असे असताना पाणीसाठा वाढीसाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. सध्या उरणकरांची व उद्योगांची तहान भागविण्यासाठी 4 हजार दशलक्ष लिटर पाणी कमी पडत आहे. रानसई धरणात पुरवठा करता येईल असा सात हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे उरणकरांच्या वाढीव पाण्याची तरतूद न केल्यास भविष्यात उरणकरांना कायमस्वरूपी पाणी कपातीची टांगती तलवार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जून महिना सरला तरी धरणक्षेत्रात पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील मृतसाठ्यानेही तळ गाठला आहे. उरणच्या लोकसंख्येच्या व येथील औद्योगिक विभागाच्या तुलनेत पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा करता यावा याकरिता रानसईमध्ये 14 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र 10 हजार दशलक्ष लिटर पाणीच उपलब्ध आहे. यामध्ये मागणीत दरवर्षी वाढ होत असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीला कसरत करावी लागत आहे. उसने पाणी घेऊन कशीबशी तहान भागवावी लागत आहे. रानसई धरणाची पाणीसाठा क्षमता वाढविण्याची मागणी मागील दोन ते अडीच दशकांपासून होत असताना त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने सध्या उरणवर पाणीकपातीचे संकट येण्याची शक्यता आहे.

उरणमध्ये मोठा पाऊस झाला तर समस्या दूर होईल. तसेच सर्वांना मुबलक पाणी पुरवठा होईल.

रवींद्र चौधरी, एमआयडीसी उपअभियंता
Exit mobile version