उघड्या वीज वाहिन्यांकडे दुर्लक्ष

महावितरण व पालिका प्रशासनाचे एकमेकांकडे बोट
। नवी मुंबई । वार्ताहर ।
देशात स्वच्छतेत अग्रेसर असलेल्या नवी मुंबईत रंगरंगोटीमुळे शहर सौंदर्यात भर पडली असली तरी जागोजागी असलेल्या उघड्या वीज वाहिन्यांमुळे त्याला बाधा निर्माण होत आहे. याबरोबरच अपघाताचा धोकाही वाढला आहे. स्वच्छ अभियानात नवी मुंबई शहर पहिल्यापासून आघाडीवर आहे. मात्र वीज पेट्यांच्या या समस्येकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. रस्त्यांलगत असलेल्या वीज जनित्राच्या पेट्या पुढील बाजूने पालिका प्रशासनाने रंगवलेल्या आहेत. मात्र माागील बाजूस उघड्या वीज वाहिन्या तशाच आहेत. या वाहिन्या अनेक वर्षांपासून अस्ताव्यस्त पसरल्याने त्यावर वाहने किंवा खोदकामात त्यांचे सुरक्षाकवच निघून गेले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या प्रकारामुळे शहरात अनेक अपघात होऊन काहींचा जीवही गेला आहे.
काही वर्षांपूर्वी बोनकोडे आणि कोपरखैरणे सेक्टर 7 येथे या वाहिन्यांना स्पर्श होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाही ही समस्या कायम आहे. रस्त्यांच्या कडेला ठरावीक अंतरावर वीज जनित्र तसेच वीज खांबांवर लावलेल्या वीज पेट्यांमधून या वीज वाहिन्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी तर जनित्र व वीज पेट्याही उघड्या आहेत. अनेकांचे दरवाजे तुटलेले आहेत. चौकांतील दुभाजकांत असलेल्या वीज पेट्यांचीही हीच अवस्था आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कचराही साठलेला आहे.

पालिकेचे हात वर
महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त बाळासाहेब राजळे यांनी त्या महावितरणाच्या असल्याचे सांगत हात झटकले. तर महावितरणाचे कार्यकारी अभियंता राजमाम माने यांनी, विद्युत जनित्र असेल तर महावितरणच्या वाहिन्या असू शकतात. मात्र रस्ते बांधकाम करताना खोदकामात वाहिन्यांचे मोठे नुकसान होत आहे.

स्वच्छ आणि सुंदर शहरातील या वीज वाहिन्या डोळ्यांना खटकतात. शहरात वारंवार स्वच्छता सर्वेक्षण होत असते. त्यावेळी हा प्रकार पालिका प्रशासनाच्या लक्षात येत नाही का? – विकास सोरटे, नागरिक, वाशी

Exit mobile version