प्रल्हाद म्हात्रे यांचा महसूल प्रशासनाविरोधात अजब निषेध
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
चेंढरे येथील विद्यानगर येथे धनदांडग्यांकडून बेकायदेशीररित्या बांधकाम करण्यात आला आहे. या बांधकामाविरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देऊनही तहसील कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली नाही. महसूल प्रशासानाकडून कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात महसूल प्रशासनाविरोधात अजब निषेध व्यक्त केला. तहसील कार्यालयात येणाऱ्यांसह अनेकांचे लक्ष गुरुवारी सायंकाळी परिधान केलेल्या निषेध पेहरावाने वेधले.
मिळालेल्या माहितीनुसार, चेढरे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यानगर येथे वरुण अजमेरा व हार्दिक अजमेरा यांनी नियमानुसार कोणतीही परवानगी न घेता रस्त्यावरील गटावर बांधकाम केले. वाहतूकीच्या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. रस्त्यालगत कोणतेही अंतर न सोडता, अनधिकृतपणे घराचे बांधकाम केले आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी आवाज उठवून ग्रामपंचायतीला पत्र दिले होते. ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी दखल घेत अनधिकृत बांधकाम असल्याचा तसेच त्यामुळे वाहतुकीचा रस्ता अरुंद झाला आहे, वाहनांना अडथळा निर्माण होत आहे, अजमेरा यांना रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत नोटीस दिली असतानादेखील त्यांनी टीएलआरकडील नकाशा दाखवून संरक्षक भिंत बांधल्याचे दिशाभूल करणारा खुलासा सादर केला आहे. प्रत्यक्ष जागेवर सहा मीटर रुंदीचा रस्ता आवश्यक असताना, प्रत्यक्ष साडेचार मीटर रुंदीचा रस्ता अस्तित्वात आहे. बांधकाम करताना रस्त्याच्या कडेला कोणतीही मोकळी जागा सोडली नाही. बांधकामाचे नियम पायदळी तुडवून तसेच एफएसआय विचारात न घेता बांधकाम केल्याचे ग्रामसेवक यांच्या निदर्शनास आले असून, त्यांनी तो अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला.
अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत योग्य ते आदेश होण्याची विनंतीदेखील पत्राद्वारे त्यांनी केली. याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले. परंतु, आजतागायत तहसील कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रल्हाद म्हात्रे यांनी गुरुवारी सायंकाळी तहसील कार्यालयात जाऊन एक आगळावेगळा निषेध व्यक्त केला. निषेधाचे कपडे परिधान करून त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातील अनेकांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी तहसीलदार विक्रम पाटील यांची भेट घेऊन कधी कारवाई करणार, अशी विचारणा केली. यावेळी तहसीलदार विक्रम पाटील यांनी मंडळ अधिकारी यांना तोंडी सूचना देत कार्यवाही करण्यास सांगितले. त्यामुळे आता मंडळ अधिकारी व तहसील काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.







