। पेण । संतोष पाटील ।
पेणनजीक असलेल्या भोगावती नदीमध्ये टाकलेला भराव हा बेकायदेशीर असून देखील महसूल खाते ठोस पाऊले उचलताना दिसत नाहीत. त्यामुळे अनधिकृत रित्या भराव करणार्याला महसूल खाते अभय तर देत नाहीत ना ? असा सवाल भोगावती संवर्धन संघटनेचे पदाधिकारी करत आहेत.
भोगावती नदीवर भुंड्या पुलाशेजारील स.न.27/3 किशोर दशरथ देशमुख व विजय एकनाथ गवळी यांचा सामाईक 0.23.80 क्षेत्र असलेला सामाईक भूखंड आहे. या सामाईक भूखंडामध्ये टाकलेला भराव हा त्या भूखंडापर्यंत मर्यादित न राहता भोगावती नदीच्याा पात्रात देखील टाकल्याचे वृत्त दै.कृषीवलमधून प्रसिद्ध होताच प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी भरावाच्या मोजणीचे आदेश दिले होते. आदेश दिल्यानंतर जवळपास महिन्याचा कालावधी उलटून गेला. ज्या कामासाठी 1 दिवसही पुरेसा ठरला असता त्या कामासाठी महिन्याचा कालावधी लागला. तो भराव मोजमाप केल्यानंतर जो अहवाल देण्यात आला त्याची आकडेवारी पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.कारण ज्या 23 गुंठयाच्या क्षेत्रात भराव टाकलेला आहे तो फक्त 378 ब्रास दाखविण्यात आला आहे.
खरं पाहता 3 हजार ब्रासच्या देखील वर मातीचा भराव या ठिकाणी टाकला असून काही भराव सर्वे नं. 27/3 चा सोडून नदीपात्रात देखील टाकला आहे. असं असताना 378 ब्रासच कसे काय हे न समजणारे कोडे होते. दुसरीकडे मातीच्या स्वामित्व कराची जी पावती जोडली आहे, ती 1 हजार ब्रास ची आहे. ती पावती श्री. रामेश्वर कन्ट्रक्शन तर्फे राजू पिचिका यांची असल्याचे देखील अहवालात म्हटले आहे. मग 378 ब्रासच्यासाठी 1 हजार ब्रासचा स्वामित्व कर कसा काय भरला गेला. हा एक संशोधनाचा विषय आहे. तर दुसरीकडे प्रांत कार्यालयातून तहसीलदारांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये सदरील भरावामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होणार असल्याचे देखील नमूद केले आहे. भोगावती नदीच्या पाणी प्रवाहाला अडथळा होणार असून देखील हा भराव काढण्यात आलेला नाही. मग महसूल खाते भोगावती नदीचा प्रवाह बदलून भूंडा पुल वाहुन जाण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल भोगावती संवर्धक समितीने उपस्थित केला आहे.
आलेल्या अहवालाची सर्व माहिती तहसील कार्यालयाकडे पाठविली असून तहसील कार्यालयाकडे दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व कार्यवाही झाल्यानंतर वस्तूस्थिती दर्शक अहवाल सादर करण्यास देखील सांगितले आहे.
विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी, पेण
किशोर देशमुख अगर विजय गवळी या इसमांना मौ.धावटे येथे केलेल्या भरावासाठी मी माती पुरवलेली नाही तसेच मी भरलेल्या स्वामित्वकराच्या (रॉयलटी) पावत्या देखील दिलेल्या नाहीत त्यामुळे या भरावाशी माझा अगर माझ्या कंपनीचा काहिही संबंध नाही. जर माझ्या स्वामित्व कर भरलेल्या पावत्यांचा दुरुपयोग केला असेल तर संबंधितांवर महसूल अधिकार्यांनी कायदेशीर कारवाई करावी. जेणे करून चुकीच्या पध्दतीने स्वामित्व कराच्या पावत्यांचा पावर करून सरकारचा कर बुडणार नाही.
राजू पिचिका, श्री रामेश्वर कंन्ट्रक्शन मालक