। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावरील जागा ही वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वाहन कर आकारणी केली जात असते. ही समिती फक्त वाहन कर घेण्यात व्यस्त दिसत असून येणारी खाजगी वाहने कशा पद्धतीने पार्क केली जात आहेत. पर्यटकांना गाड्या पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध आहे की नाही याकडे नेहमीच दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी येत आहेत.
पर्यटक आपल्या किंमती गाड्या अनेकदा जागेअभावी कुठेही जंगलात पार्क करत असतात. गर्दीच्यावेळी तर नवख्या पर्यटकांची खूपच त्रेधातिरपीट उडते. एकीकडे गाडी पार्किंगसाठी वेळ खर्ची होत असतो. त्यामुळे इथे येऊन आपण चुकी तर केली नाही ना असेच सूर त्यांच्याकडून ऐकावयास मिळतात. याचाही इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. वनसमितीने आजवरच्या कार्यकाळात विविध पॉईंट्सच्या सुशिभिकरणाकडे लक्ष केंद्रित केले होते. परंतु निदान यापुढे तरी पर्यटन वृद्धीसाठी वनसमितीने पर्यटकांना बारकाईने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तत्परता दाखवावी असे स्थानिकांमधून बोलले जात आहे.