तीन जनावरांची केली सुटका; चालकाला पोलिस कोठडी
| नेरळ | वार्ताहर |
पोलिसांनी बेकायदा जनावरांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. बोलेरो गाडीमध्ये जनावरे कोंबून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. गाडीतील तीन जनावरांची सुटका करण्यात आली आहे. सदरची जनावरे कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
केशव निवृत्ती बताले याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्यात एकूण तीन लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. त्यामध्ये 70 हजार रुपये किमतीची जनावरे आणि गाडी यांचा समावेश आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पदभार घेतल्यानंतरची 15 दिवसातील ही तिसरी कारवाई आहे. 21 ऑक्टोबर रोजी नेरळ पोलिस ठाणे हद्दीत सायंकाळी साडे चार वाजता एक बोलेरो जीप संशयास्पद रीतीने कर्जत कल्याण रस्त्याने प्रवास करीत होती. संबंधित गाडी बद्दल संशय आल्याने पोलिसांनी गाडी थांबवली. चौकशी केली असता पनवेल वारदोली येथील केशव निवृत्ती बताले हा आपली गाडी घेवून दामत येथे चालला असल्याचे चौकशीत पुढे आले. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता. त्या गाडीमध्ये तीन जनावरे कोंबून ठेवल्याचे दिसून आले. चालक हा दामत येथील एका व्यक्तीच्या सांगण्यावरून ती जनावरे नेत असल्याचे सांगितल्यावर नेरळ पोलिसांनी दमत गावात जावून त्या तरुणाचा शोध घेतला. जनावरांना नेरळ पोलिसांनी कोंभलवाडी येथील गोशाळेत पाठवून दिले.