प्रादेशिक परिवहन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
यावर्षी लांबलेला पावसाळा संपल्यानंतर श्रीवर्धन तालुक्यामध्ये पुन्हा एकदा अनधिकृत बॉक्साइड उत्खनन तेजीत सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बॉक्साइड उत्खनन करून अनेक व्यक्ती आपला उत्कर्ष साधत आहेत. परंतु, यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनधिकृत उत्खनन अशाच प्रकारे सुरू राहिल्यास केरळमधील वायनाडच्या घटनेची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. बॉक्साइड उत्खनन करताना शासनाकडून अनेक नियम व अटी घालून दिलेल्या असतात.
परंतु, बॉक्साईटचे उत्खनन करणाऱ्या कंपन्यांकडून यापैकी कोणत्याही गोष्टीचे पालन केले जात नाही. ज्या ठिकाणी जमिनीमध्ये खोलवर ड्रिल मारून बॉक्साईडसाठी ब्लास्ट घडविला जातो. त्या ठिकाणी बॉक्साइड काढून झाल्यानंतर पुन्हा माती भराव करून त्यावरती वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. परंतु, आजपर्यंत श्रीवर्धन तालुक्यात हजारो टन बॉक्साइडचे उत्खनन होऊन सुद्धा कुठल्याही कंपनीने पर्यावरणाशी आपली बांधिलकी जपलेली पाहायला मिळत नाही.
काही महिन्यापूर्वी बॉक्साइड उत्खननाची वाहतूक करणाऱ्या काही टोळ्यांनी आपला असलेला पक्ष बदलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केवळ या धंद्यासाठीच प्रवेश केल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. बॉक्साइडचे उत्खनन करण्यासाठी जे ब्लास्ट केले जातात, त्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा सुविधा राबविली जात नाही. उत्खननासाठी ड्रिल केलेल्या बोगद्यात पावसाचे पाणी साठून श्रीवर्धन तालुक्यात देखील आगामी काळात मोठे भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, महसूल प्रशासनाकडून या बॉक्साइट उत्खनाकडे डोळेझाकच करण्याचे धोरण अवलंबिले जात आहे.
बॉक्साइडची अवजड वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त घेऊन जाणारे मालवाहू ट्रक, गाडी भरलेली असताना अत्यंत कमी वेगाने घाट चढत असतात. परंतु, रिकामी करून आल्यानंतर सदरच्या गाड्या अतिशय वेगाने येत असल्यामुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच क्षमतेपेक्षा जास्त बॉक्साईड भरलेल्या गाड्यांचे अनेक वेळा अपघात होऊन त्यामध्ये चालकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. मात्र, या बॉक्साइडच्या अवजड वाहतुकीवर प्रादेशिक परिवहन विभाग पेण यांच्याकडून ही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. कारण बॉक्साइडची वाहतूक करणाऱ्या माफीयांनी या सर्व यंत्रणांना आर्थिक तडजोडी मध्ये गुंतवून ठेवल्यामुळे अवजड वाहतुकीचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील मेघरे, सायगाव, कुरवडे, खुजारे या गावांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती बॉक्साइड उत्खनन झालेले आहे व यापुढेही केले जाणार आहे. श्रीवर्धन तालुका सध्या पर्यटनासाठी पर्यटकांच्या पसंतीचे क्रमांक एकचे ठिकाण आहे. परंतु, या ठिकाणाहून अशाच प्रकारे बॉक्साइड वाहतूक होत राहिली तर या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य धोक्यात येईल व या ठिकाणी होणाऱ्या पर्यटन व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृत उत्खनाबाबत तातडीने कारवाई करून या ठिकाणच्या वनसंपत्तीचा व पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. याची दक्षता घेण्याची मागणी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.







