क्रीडा संकुलात बेकायदेशीर बोरवेलचा डाव उधळला

नगराध्यक्षा भावना घाणेकर यांची धडक

| उरण | प्रतिनिधी |

उरण नगर परिषदेच्या मालकीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी बेकायदेशीर बोरवेल खोदकामाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नगर परिषदेची कोणतीही परवानगी नसताना सार्वजनिक मालमत्तेवर सर्रासपणे खोदकाम सुरू असल्याचे समोर येताच नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी घटनास्थळी धाव घेत हा प्रकार रंगेहाथ पकडला. त्यामुळे उरणच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

क्रीडा संकुलातील जलतरण तलावासाठी पाण्याची गरज असल्याचे कारण पुढे करून हा प्रकार करण्यात येत होता. मात्र, नगर परिषदेची लेखी परवानगी नसताना थेट बोरवेल खोदण्याचे धाडस नेमके कोणाच्या आशीर्वादाने करण्यात आले, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी मुख्याधिकारी जीवन पाटील आणि कार्यालय अधीक्षक राजेंद्र घाडगे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, अशा कोणत्याही कामासाठी नगर परिषदेने परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. घटनास्थळी पाहणीदरम्यान एमएच-06 बीक्यू-9110 या वाहनाद्वारे बोरवेल खोदकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे शनिवार-रविवारच्या सुट्टीचा आणि वरिष्ठ अधिकारी शहराबाहेर असल्याचा गैरफायदा घेत हे खोदकाम चोरट्या पद्धतीने सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार पूर्वनियोजित होता का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत बोलताना नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “नगर परिषदेच्या मालकीच्या जागेत बेकायदेशीरपणे घुसखोरी करून मनमानी करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. क्रीडा संकुलाच्या ठेकेदाराकडे लाखो रुपयांची थकबाकी असताना आणि मुदतवाढ नसताना अशा प्रकारचे काम करणे म्हणजे नगर परिषदेच्या अधिकारालाच आव्हान देण्याचा प्रकार आहे. संबंधितांवर तात्काळ फौजदारी कारवाई झालीच पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
या पाहणीवेळी माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेवक मंगेश कासारे, नगरसेविका नाहिदा ठाकूर, नगरसेविका प्रार्थना म्हात्रे तसेच नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.उरणच्या जनतेच्या मालकीच्या जागेवर झालेल्या या बेकायदेशीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दोषींवर केवळ कागदी कारवाई नव्हे तर कठोर फौजदारी कारवाई होणार का, याकडे संपूर्ण उरणचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version