| पेण | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्ग आणि खड्डे हे समिकरण हे काही नवीन राहीलेले नाही. आता मात्र मुंबई-गोवा महामार्ग आणि अवैध धंदे हे समिकरण नव्याने प्रस्तापित होत असल्याचे दिसून येत आहे. गुटख्यापासून तंबाखूपर्यंत ते दारूपासून एमडीपर्यंत अनेक अवैध धंदे मुंबई-गोवा महामार्गावर रात्रीच्या वेळी सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवैध धंद्यांना राजकारणी तसेच पोलिसांचे संरक्षण मिळत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, पेण तालुक्यात कोण्त्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु नाहीत, तसे असल्याचे समोर आल्यास त्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपविभागीय अधिकारी शिवाजी फडतरे यांनी सांगितले.
खारपाडा गोविर्लेच्या दरम्यान राजरोसपणे अवैध भंगार धंदा सुरू असून देखील पोलिस गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. येथील अवैध्य भंगार धंद्याला पेणच्या लोकप्रतिनिधींचा विरोध असताना देखील तो विरोध न जुमानता इतर सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी भंगार व्यावसायिकावर मेहर नजर दाखवून भंगार धंद्यांला पाठबळ दिल्याचे दिसून येते.
अवैध धंद्याना जर लोकप्रतिनिधीच पाठबळ देत असतील, तर यापेक्षा वाईट ते काय. महत्वाची बाब म्हणजे पेण तालुक्यातील लोकप्रतिनिधी अवैधधंद्यांना अजिबात खतपाणी घालत नाहीत, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. परंतु बाहेरील तालुक्यातील लोकप्रतिनिधी अशा व्यावसायिकांची पाठराखण करत असल्याची चर्चा आहे. पोलिस कारवाई करण्यास तयार आहेत, मात्र राजकीय दबाव वाढत असल्याने अशा अवैद धंदेवाल्यांचे फावत असल्याचे बोलले जाते.
पेण तालुक्याच्या हद्दित इतर तालुक्यातील लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करत असतील तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा हस्तक्षेप खपून घेणे कीती योग्य आहे. या बाबीचाही विचार करण्याची वेळ आली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात महामार्गावरील अवैधधंद्यांचा लेखाजोखा मांडला जाईल एवढे नक्की. लोकप्रतिनिधींनी आपला आशिर्वाद या अवैध धंद्यांवरून काढले, तर ठिक अन्यथा या लोकप्रतिनिधींसाठी ते त्रासदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.