राजाश्रयामुळे अवैध धंदे तेजीत?

जिते येथे हॉटेलच्या दाराआडून इंधनाची तस्करी ; प्रशासन, पोलीस यंत्रणेचे कारवाईकडे दुर्लक्ष?


| पेण | प्रतिनिधी |

पेण जिते गावाच्या हद्दीत महामार्गावरील एका हॉटेलच्या दाराआड अनेक दिवसापासून ऑइल, पेट्रोल, डिझेल, केमिकल तस्करीचे काम जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. परंतु, याकडे खादी आणि खाकीवाल्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी चाललेल्या अवैध धंद्यानां खादीचा आशीर्वाद असल्याने खाकीवाल्यांना बघण्यापलीकडे कोणतीच भूमिका घेत येत नाही, असे चित्र सध्या रायगडमध्ये पहायला मिळत आहे. अनेक परप्रांतीय अवैध धंदा करणाऱ्यांना रायगडच्या खादीवाल्यांनी राजश्रय दिला असल्याने खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

राज्यासह परराज्यातून ऑइलचे टँकर एमआयडीसी तसेच पेट्रोल पंपावर येत असतात. यामध्ये पेट्रोल, डिझेलची चोरी करण्याचे काम जिते गावाच्या जवळ महामार्गावरील एका हॉटेलवर जोरात सुरू असून, काही प्रमाणात वशेणी-दादर खाडीतूनदेखील डिझेल जितेपर्यंत पोहोचवले जात असून, या ज्वलनशील पदार्थांची भेसळ याठिकाणी होत असल्याची चर्चा आहे. परंतु, अलिबाग आणि कर्जतच्या दोन बड्या नेत्यांचे या धंद्याला आशीर्वाद असल्याने पोलीस यंत्रणा सध्या तरी गांधारीच्या भूमिकेत आहे. त्यामुळे दिवसभर सकाळ-संध्याकाळ ऑइलची तस्करी जोरात सुरू असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेल, ऑईलची चोरी होऊन चोरी करताना या स्फोटक केमिकलचा स्फोट झाला तर गावाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती सध्या ग्रामस्थांना सतावत आहे. ऑइल, पेट्रोल, डिझेलच्या नावाखाली घातक केमिकल, अमली पदार्थ तसेच स्फोटके आली, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत. याविषयी सागरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना विचारण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही.

अवैध धंदे तेजीत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपासून आणि गुटख्यापासून मटक्यापर्यंत, एमडीपासून गांजापर्यंत अनेक अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत. या धंद्यांना नक्की राजश्रय कुणाचा? खाकीचा की खादीचा? याविषयी सध्या पनवेलपासून पोलादपूरपर्यंत चर्चा रंगत आहेत.

‌‘ते’ नेते कोण?
या अवैध धंद्यांना अलिबाग आणि कर्जतच्या दोन बड्या नेत्यांचा आशीर्वाद असल्याने पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे हे दोन बडे नेते कोण, याविषयी जिल्हाभर चर्चेला उधाण आले आहे.

Exit mobile version