उरणमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील जेएनपीए परिसरातील जसखार, सोनारी, करळ-सावरखार गावाजवळील रस्त्याच्या कडेला दुतर्फा जागेत समाजकंटक व गावगुंडांनी अवैधरित्या अनेक कंटेनर पार्किंग, गॅरेज, ढाबे उभारले आहेत. जेएनपीए व पोलीस अशा शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेचे हे अवैध धंदे सुरू असल्याचे स्थानिक नारिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

उरणमधील जेएनपीए व शासकीय मालकीच्या सोनारी व जसखार ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक मोकळ्या जागा आहेत. या जागांवरील जासईपासून जेएनपीए सेझ व करळच्या उड्डाणपुलाच्या खाली काही समाजकंटक व गावगुंडांनी कब्जा केला आहे. या ठिकाणी त्यांनी अवैधरित्या अनेक कंटेनर पार्किंग, गॅरेज व ढाबे उभारलेले आहेत. तसेच, त्यांच्याकडून वाहन चालकांना दमदाटी प्रसंगी शिवीगाळ व मारहाण करून जबरदस्तीने अवजड वाहने पार्किंग करण्याची सक्ती केली जात आहे. दादागिरीच्या जोरावर पार्किंगच्या नावाने दामदुप्पटीने पैसेही उकळले जात आहेत. त्याचबरोबर या अवैधरित्या उभारण्यात आलेल्या जागेतील ढाबे व कॅन्टीनमधून राजरोसपणे दारु व अंमली पदार्थाची विक्री केली जात आहे. त्यामुळे अशी अवैध ठिकाणे समाजकंटक, माफिया व गुंडांचे अड्डे बनत चालले आहेत. तसेच, या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असून अपघात देखील घडत आहेत. मात्र, याकडे जेएनपीए प्रशासन व पोलीस अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. तसेच, अवैध पार्किंग, ढाबे यांना जेएनपीए व पोलीस अधिकाऱ्यांकडून पाठबळ दिले जात असल्याचा आरोप देखील नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे हे अवैध धंदे अधिकच तेजीत आले असून काही विपरीत घटना घडण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

जागा मोकळ्या करण्याच्या नोटीसा
जसखार, सोनारी, करळ-सावरखार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जेएनपीएच्या मालकीच्या जागेत अवैधरित्या पार्किंग, गॅरेज व ढाबे उभारण्यात आले आहेत. याबाबत तक्रारीही जेएनपीएकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संबंधितांना जागा मोकळ्या कराव्यात यासाठी नोटिसाही बजाविण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती जेएनपीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उरण शहरासह जेएनपीए परिसर आणि न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर पार्किंग, ढाबे, कॅन्टीनमधुन चालणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यावर जेएनपीए प्रशासन व पोलिसांच्या मदतीने कारवाईची मोहीम कायम सुरुच असते.

-दिपक सुर्वे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा-शेवा बंदर पोलीस

Exit mobile version