महसूल विभागाचे दुर्लक्ष
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील किनारपट्टीच्या भागात बेकायदा बांधकामे सुरू असून सीआरझेड कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. येथील धनदांडग्यांचे महसूल विभागाशी साटेलोटे असल्याने बांधकामांचा सपाटा सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
तालुक्यातील समुद्रकिनारी सीआरझेेड कायद्याचे उल्लंघन करीत अनधिकृत बांधकाम अनेक धनदांडग्यांकडून सुरू आहे. गुरचरण जागा ग्रामपंचायती अखत्यारीत असते. परंतु, त्या ठिकाणच्या स्थानिक सदस्यांना किंवा नेत्यांना हाताशी धरून काही मोठ्या शहरातील धनदांडग्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे समुद्रकिनार्यावरील गुरचरण जागेमध्ये बांधकाम केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी आरसीसी प्रकारचे पक्के बांधकाम करत असल्याचे दिसत आहे. याबाबत बांधकाम करणार्यांना महसूल विभागाची कोणतीही भीती राहिलेली नाही. कारण, त्या त्या ठिकाणचे स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आपल्या फायद्यासाठी या बांधकामांना अभय दिल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.





