उरण तालुका पत्रकार संघटनेतर्फे कारवाईची मागणी
भूमिका न घेतल्यास लाक्षणिक उपोषणाचा इशारा
उरण तहसील प्रशासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन
। उरण । वैशाली कडू ।
राष्ट्रीय महामार्ग 4ब आणि राज्य महामार्ग 54 परिसरात बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदाम यांनी बस्तान मांडले असून, याप्रकरणी प्रशासनाने आवश्यक ती भूमिका घेत संबंधितांवर कारवाई करावी आणि अनाधिकृत प्रकार बंद करावेत, अशी मागणी उरण तालुका पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
याशिवाय जर प्रशासनाने आवश्यक ती भूमिका घेतली नाही, तर आगामी प्रजासत्ताक दिनी लाक्षणिय उपोषण करण्याचा इशारा संघटनेतर्फेे देण्यात आला आहे. यासंबधीचे निवेदन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना सादर झाल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर आवश्यक त्या कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
राज्याला अनाधिकृत बांधकामे आणि त्यासंदर्भातील प्रशासनाची डोळेझाक भूमिका काही नवीन नाही. अर्थातच गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या या बेकायदा कंटेनर यार्ड आणि गोदामांची केवळ यादी तहसील कार्यालयाकडून दिली जात असली तरीही अशा बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामांवर प्रत्यक्ष कारवाई मात्र होताना दिसत नाही.
या बेकायदेशीर गोदामे तसेच यार्डकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसल्याने या यार्ड व गोदामांशेजारील रस्त्यांच्या मार्गांवर दोन लेनमध्ये अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जात असल्याचे नेहमीच दिसून येत आहे आहे. ज्यामुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी होत असते. त्याचप्रमाणे वाढत्या अपघातांनाही ही बेकायदा पार्कींग सातत्याने कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशा काही गोदामांच्या परिसरात तर गावगुंडांकडून अवैधरित्या रस्त्यांवरच वाहनतळे निर्माण झाली आहेत, जी वाहतूक कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.
राज्य महामार्ग 54 आणि राष्ट्रीय महामार्ग 4 ब या रस्त्यांलगत असलेले सर्व्हिस रोड महामार्गांलगत असणार्या गावांना जोडण्यासाठी बनवण्यात आले आहेत. या मार्गावरून अवजड वाहनांना वाहतूक करता येत नाही. मात्र सर्व्हिस रोडचा वापर बेधडकपणे अवजड वाहने करत आहेत. यामुळे होणार्या अपघातांमध्येे सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या सर्व प्रकरणांची मुळे संबंधित परिसरात दिमाखदारपणे उभी असणार्या अनाधिकृत कंटेनर यार्ड आणि गोदामांमध्ये आहे.
यामुळेच तहसील कार्यालयाच्या यादीनुसार मुळातच बेकायदेशीर असलेल्या उरण तालुक्यातील सर्वच बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामे तात्काळ बंद करण्यात यावीत अशी पत्रकार संघाची मागणी असल्याचे नमूद केले आहे.
तसेच या मागणीनुसार संबंधित बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामे यांच्यावर तातडीने कारवाई करून ती सर्व बंद न केल्यास, नाईलाज म्हणून निवेदनावर सही करणारे उरण तालुक्यातील पत्रकार येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे दि.26 जानेवारी 2022 रोजी लाक्षणिक उपोषण करतील, तसेच एक दिवसीय लाक्षणिक उपोषणानंतरही प्रशासनावर कोणताही फरक न पडल्यास पुढील निर्णय म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना या आंदोलनात उतरवून आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात नमूद करण्यात आला आहे.
पत्रकार संघातर्फे संबंधित निवेदन प्राप्त झाल्यावर उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी आपण लवकरात लवकर संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग व यार्ड मालक यांची तुमच्याबरोबर बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन उरण तालुका मराठी पत्रकार संघाला दिले आहे.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, संजय गायकवाड, अजिती पाटील, विरेश मोडखरकर, दिलीप कडू, पंकज ठाकूर, प्रवीण कोलापटे, पंकज ठाकूर,आशिष पाटील, सुयोग गायकवाड, विशाल गाडे, पूजा चव्हाण आदी उपस्थित होते.







