। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कोळगांव गट नंबर 145 क्षेत्र 9.06.40 हे आर ही जमिन मिळकत महाराष्ट्र शासनामार्फत गुरचरणसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ही मिळकत महसूल दप्तरी सातबारा कोष्टकी महाराष्ट्र शासन यांच्या नावे गुरचरण म्हणून नोंदण्यात आली आहे. ही मिळकत देखरेखीसाठी स्थानिक स्वराज संस्था म्हणून सासवणे ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली आहे. असे असतानाही ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेता वेदात्मा प्रॉपर्टीज प्रा. लि. या कंपनीने या जागेतून भूमीगत केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली आहे.
कोळगांव व सासवणे येथील ग्रामस्थांची गुरे व जनावरे चारण्यासाठी या गुरचरण जागेचा वापर केला जात आहे. कोळगांव व सासवणे येथील ग्रामस्थांना त्यांची गुरे व जनावरे चारण्यासाठी कोळगांव गट नंबर 145 या मिळकतीशिवाय अन्य कोणतीही जागा उपलब्ध नाही. याच गुरचरण जागेत कोळगांव परिसरात वेदात्मा प्रॉपर्टीज प्रा. लि. कंपनीच्या वतीने बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या जागेतून भूमीगत विद्यूत तार टाकण्याच्या प्रयत्नात ही कंपनी आहे. कंत्राटदारामार्फत बेकायदेशरित्या खोदकाम सुरु करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता, तसेच स्थानिकांना विश्वासात न घेता हा प्रकार भांडवलदारांकडून सुरु आहे. जिल्हा प्रशासनाचीदेखील कोणतीही परवानगी न घेता हा गैरप्रकार सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणात प्रशानस नेमकी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
परिणामी, गुरे, जनावरे चरण्याच्या जागेत बांधकाम व विद्यूत तारा उभारण्यात आल्यास या जनावरांवर उपासमारीची वेळ येण्याची भिती आहे. या बांधकामामुळे स्थानिक ग्रामस्थांसह जनावरांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या बेकायदेशीर बांधकाम व खोदकामाला तातडीने थांबविण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाणार असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत उपसरपंच राजेश नाखवा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
प्रकरण न्यायप्रविष्ठ
गुरचरण जागेबाबत प्रकरण न्याय प्रविष्ट असतानादेखील संबंधित कंपनीचे भांडवलदार व ठेकेदार दुर्लक्ष करीत त्याच जागेत बांधकाम व खोदकाम करीत आहेत. या जागेबाबतचा निकाल अद्याप लागलेला नसतानाही भांडवलदाराकडून त्या जागेवर खोदकाम सुरु आहे.
भांडवलदारांचा मनमानी कारभार
कोळगाव येथील गुरचरण जागा ग्रामपंचायतीच्या देखरेखेखाली आहे. अनेक गुरे व जनावरे चरण्याची एकमेव ही जागा आहे. मात्र ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता भांडवलदार नियमांचे उल्लंघन करीत मनमानी कारभाराने बांधकाम व खोदकाम करीत असल्याचा आरोप नाखवा यांनी केला आहे.
ग्रामपंचायतीला व स्थानिकांना विश्वासात न घेता खुलेआमपणे कोळगांव येथील गुरचरण जागेत खोदकाम व बांधकाम सुरु आहे. या खोदकामामुळे स्थानिकांसह गुरे, जनावरांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे काम तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
राजेश नाखवा,
उपसरपंच सासवणे