नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील जेएनपीए परिसरातील जसखार, सोनारी, करळ-सावरखार गावाजवळील रस्त्याच्या कडेला दुतर्फा जागेत समाजकंटक व गावगुंडांनी अवैधरित्या अनेक कंटेनर पार्किंग, गॅरेज, ढाबे उभारले आहेत. जेएनपीए व पोलीस अशा शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेचे हे अवैध धंदे सुरू असल्याचे स्थानिक नारिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
उरणमधील जेएनपीए व शासकीय मालकीच्या सोनारी व जसखार ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक मोकळ्या जागा आहेत. या जागांवरील जासईपासुन जेएनपीए सेझ व करळच्या उड्डाणपुलाच्या खाली काही समाजकंटक व गावगुंडांनी कब्जा केला आहे. या ठिकाणी त्यांनी अवैधरित्या अनेक कंटेनर पार्किंग, गॅरेज व ढाबे उभारलेले आहेत. तसेच, त्यांच्याकडून वाहन चालकांना दमदाटी प्रसंगी शिवीगाळ व मारहाण करून जबरदस्तीने अवजड वाहने पार्किंग करण्याची सक्ती केली जात आहे. दादागिरीच्या जोरावर पार्किंगच्या नावाने दामदुप्पटीने पैसेही उकळले जात आहेत. त्याचबरोबर या अवैधरित्या उभारण्यात आलेल्या जागेतील ढाबे व कॅन्टीनमधुन राजरोसपणे दारु व अंमली पदार्थाची विक्री केली जात आहे. त्यामुळे अशी अवैध ठिकाणे समाजकंटक, माफिया व गुंडांचे अड्डे बनत चालले आहेत. तसेच, या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असून अपघात देखील घडत आहेत. मात्र, याकडे जेएनपीए प्रशासन व पोलीस अधिकारी यांच्याकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे काही विपरीत घटना घडण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अशा बेकायदेशीर पार्किंग, ढाबे, कॅन्टीनमधुन चालणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांवर जेएनपीए प्रशासन व पोलिसांच्या मदतीने कारवाईची मोहीम कायम सुरुच असते, अशी माहिती न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांनी दिली आहे.
