अवैध गुटखा वाहतूक करणारे जेरबंद

टेम्पोसहित सव्वा बारा लाखांचा माल जप्त; दादर सागरी पोलिसांची कामगिरी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अवैधरित्या बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या टेम्पो चालकाला जेरबंद करत त्याच्याकडील अवैध गुटख्यासह टेम्पोसहित तब्बल 12 लाख 20 हजारांचा मुद्देमाल दादर सागरी पोलिसांनी जप्त केला आहे.

दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील हे स्टाफसह दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना गोपनीय बातमीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावरून मुंबई बाजूकडून पेण बाजूकडे आयशर टेम्पो क्र. एमएच/43/बीजी/0719 यामध्ये अवैधरित्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा/पानमसाला घेऊन जात आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, सहायक फौजदार एस.जी. पाटील, पोलीस हवालदार कोकरे, पोलीस नाईक म्हात्रे यांनी आंबिवली फाटा गावच्या हद्दीत हॉटेल गार्डन फुड अ‍ॅन्ड स्नॅक्सजवळ सापळा रचला. मुंबई बाजूकडून पेण बाजूकडे मिळालेल्या माहितीनुसार आयशर टेम्पोला पोलीस हवालदार कोकरे व पोलीस नाईक म्हात्रे यांनी थांबविले. त्यानंतर टेम्पो चालकास नाव गाव विचारता त्याने आपले नाव गुफरान फौजदार खान (26) रा. डुडोवा नवावा, ता.तिलोही, पो.पिडी, जि.अमेठी, उत्तर प्रदेश, पोलीस ठाणे मोहनगज असे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडे सदर वाहनामध्ये असलेल्या मालाची पावती मागितली. त्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला म्हणून पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये पाच पोलीथीनच्या सफेद बॅगा व पाच गोणी होत्या.

टेम्पोमधील मालाचा संशय आल्याने जागीच दोन पंच तांबडशेत पोलीस पाटील अशोक पाटील, डावरे पोलीस पाटील वासुदेव घरत यांना समक्ष बोलावून घेऊन त्यांच्या समक्ष गोणी खोलून पाहणी केली. त्यामध्ये गुटखा/पानमसाला/तंबाखु असल्याचे दिसून आले. हा गुटखा व टेम्पोसहीत 12 लाख 20 हजार रुपयांचा माल जप्त केला. तसेच आरोपी गुफरान फौजदार खान यास जप्त मालासह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Exit mobile version