Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील

महसूल विभागाची धडक कारवाई

| तळा | प्रतिनिधी |

तळा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध जांभा दगड उत्खननाविरोधात तळा महसूल विभागाने धडक कारवाई करत तालुक्यातील सात जांभा खाणी सील केल्या आहेत. पर्यावरणाची हानी, वाढते धुळीचे प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

तालुक्यातील मौजे चरई बुद्रुक येथील गट क्रमांक 72/5/ड आणि 72/6 मधील जमिनीवर मे. अविष्कार रिॲलिटी प्रा. लि., मुंबई यांना जांभा दगड उत्खननासाठी परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे संचालक सुशील नारायण कौशिक यांनी ही जागा दोन वर्षांच्या भाडेकरारावर भोगील भुवण, समाधान लांडे, संदेश अधिकारी आणि शंकर चव्हाण यांना उत्खननासाठी दिली होती. तसेच वांजलोशी येथील जमीन मालक गौऱ्या सखाराम पवार तसेच चालक राजू चव्हाण आणि मल्लेश राठोड यांना प्रांत कार्यालयाकडून अल्प मुदतीचा गौण खनिज उत्खनन परवाना देण्यात आला होता.

मात्र, या जांभा दगड खाणींमुळे परिसरातील पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. हवेत मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण निर्माण होत असून, नागरिकांना श्वसनाचे आजार उद्भवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. यासंदर्भात तळा तहसीलदारांकडे लेखी तक्रारही दाखल करण्यात आली होती.

दाखल तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी केली असता शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चरई बुद्रुक येथील पाच आणि वांजलोशी येथील दोन अशा एकूण सात जांभा खाणींचे अल्प मुदतीचे गौण खनिज उत्खनन परवाने रद्द करण्यात आले. यानंतर तळा महसूल विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन जांभा दगड खाणी सील करण्याची कारवाई केली. या कारवाईवेळी महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, महसूल विभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अवैध उत्खननाविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version