पोलीस प्रशासनाकडून केराची टोपली
| महाड | प्रतिनिधी |
महाडच्या क्रांतीभूमीत गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर मटका आणि ऑनलाईन लॉटरी व्यवसाय तेजीत आहे. हे बेकायदेशीर उद्योग किरकोळ कारवाईनंतर पुन्हा सुरू केले जातात. पोलिसांचे पूर्ण अभय असल्याने दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र या तक्रारींना महाड शहर पोलीस निरीक्षकांनी केराची टोपली दाखवली आहे. पोलीस अधीक्षक देखील याबाबत गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाड शहर हे छ. शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. राजकीय, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील दिग्गज या महाड क्रांतीभूमीने दिले आहेत. महाडमध्ये वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव देखील प्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक चवदारतळे येथे प्रतिवर्षी लाखो भीम अनुयायी महामानवाला अभिवान करण्यासाठी येत असतात.
शहरातील छ. शिवाजी चौक परिसराला देखील या व्यवसायाने वेढा दिला आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख रस्ते, नातेखिंड, महामार्ग याठिकाणी टपऱ्यांमधून मटका दुकाने खुलेआम सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील जनता, आदिवासी, तरुण मुले झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मटका आणि ऑनलाईन लॉटरीकडे वळत आहेत. यातून व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोटाची भूक भाग्वण्यासाठी धडपड करत असलेले आदिवासी या मटका दुकानांचे बळी ठरत आहेत. दिवसभर मेहनत करून कमावणारे आपले पैसे मटक्यावर उधळत असल्याने अनेकांचे संसार धोक्यात आले आहेत. हे अनधिकृत व्यवसाय हद्दपार होण्यासाठी पोलीस प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करणे आवश्यक आहे. या मटका व्यवसायाबाबत एका राजकीय लोकप्रतिनिधीने देखील तक्रार केली होती.