अवैध मटका जुगाराला राजकीय वरदहस्त?

पोलिसांचा धाक राहण्यास उदासीनता

| अलिबाग | प्रतिनिधी |

जलद पैसा मिळविण्याच्या नादात तरुणाई अवैध मटका जुगाराच्या आहारी जाऊ लागली आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरुणांसह कामगार, रोजनदारीवर काम करणारा छोटा मजूर वर्गात व्यसनाधिनता वाढत आहे. स्थानिक पोलिसांकडून मटका जुगारावर कारवाई केली जात आहे. मात्र काही बड्या स्थानिक राजकीय नेत्यांचा या जुगारांवर वरदहस्त असल्याने कारवाई करताना दबाव येत असल्याची चर्चा सुुरू आहे.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या जिल्ह्याच्या ठिकाणीच अलिबाग शहरामध्ये एसटी बस स्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भाजी मार्केट, रिक्षा स्टँड, अलिबाग-रेवदंडा बायपास रोड, चेंढरे, येथे असणाऱ्या जकात नाकानजीक, जुनी भाजी मार्केट, पोलीस वसाहत या भागांत खुलेआम मटका जुगारांचे छुपे अड्डे तयार झाले आहेत. कुरुळपासून चोंढी परिसरात जुगाराचे क्लब राजरोसपणे सुरु आहेत. अलिबाग शहरात राजरोसपणे चक्री जुगारदेखील चालत आहे. अलिबासह अनेक भागांमध्ये मटका जुगार फोफावत चालला आहे. फोन मटका तसेच मटका जुगारांचे अन्य ही प्रकार खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कामगारांना मटका खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या बुकिंकडून लाखों रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे.

मटका जुगार घेणारे त्यांना प्रोत्साहन करत आहेत का? आकडे लावणाऱ्या लोकांचे टोळकेदेखील या मटका अड्ड्याच्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत. मटका जुगार खेळणाऱ्या बुकीकडून दिवसभरात लाखो रूपयांची उधळपट्टी होत आहे. यामध्ये सर्वात जास्त फोन मटका चालविला जात आहे. फोनमार्फत आकडे लावणे आणि फोनवरच पैशाची बोली लावणे असे प्रकार चालू आहेत. अवैध मटका जुगारांवर काही पोलिसांकडून कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांना सत्तारुढ पक्षातील बड्या राजकीय नेत्यांचा फोन येतो, असा अनुभव आहे. राजकीय वरदहस्तामुळे मटका जुगार चालविणाऱ्यांवर पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याने मटका चालक मालकांची मक्तेदारी जोरात सुुरु आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने सुसाट सुटलेल्या अवैध मटका जुगार चालकांसह मालकांपर्यंत पोहोचताना हात तोकडे पडत आहेत.

रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे एक संयमी, शांत व कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईत असताना त्यांनी अवैध धंदा करणाऱ्यांना वठणीवर आणले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह अलिबागमध्ये सुरु असलेल्या अवैध मटका जुगार चालविणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यास यशस्वी ठरतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version