सचिन पाटील यांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुरकुंडी वडिलोपार्जित जमीनीवर बेकायदेशीररित्या उत्खनन करून चुकीच्या पध्दतीने रॉयल्टी देण्यात आल्याचा आरोप सचिन पाटील यांनी केला आहे. या कामात अधिकार्यांचे मोठे आर्थिक हित संबंधत असल्याचाही आरोप करीत उत्खनन थांबवून रॉयल्टी रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुरूड तालुक्यासह अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी उत्खनन राजरोसपणे सुरु आहे. काहीठिकाणी डोंगर पोखरून मातीचे उत्खनन केले जात आहे. पर्यावरणाचा त्यामुळे र्हास होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर वेगळ्या जागेतील माती उत्खनन करण्यासाठी रॉयल्टी भरली जाते. तर, अन्य ठिकाणची माती काढत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
अलिबाग तालुक्यातील सचिन पाटील यांच्या सांगण्यानुसार, कुरकूंडी कोलटेंभी येथे वडीलोपार्जीत मालकीची जमीन आहे. शेजारील जमीन धारकांकडून पाटील यांच्या जमीनीवर बेकायदेशीर उत्खनन करून शासनाची फसवणूक करून चुकीच्या पध्दतीने रॉयल्टी मिळविली आहे. डोंगर पोखरण्याचे काम काही धनदांडग्याच्या मदतीने सुरू आहे. त्यामुळे सचिन पाटील यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे अस्तित्व संपविण्याचे काम केले जात आहे. भूखंडाचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. तसेच भूविकसन विभाग, भूमापन खाते, खनिकर्म कार्यालयासह महसूल विभागाकडून योग्य पाहणी न करता उत्खननाला परवानगी देण्यात आली आहे. बेकायदेशीर कृत्यामुळे नैसर्गिक डोंगर नष्ट झाला असून, जैवविविधतेचा नाश केला आहे. पाणी साचण्याचे व निचर्याचे नैसर्गिक मार्गही बाधित झाल्याचा आरोप सचिन पाटील यांनी केला आहे. याबाबत तहसील कार्यालयापासून मंडळ अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र, त्यांच्याकडून कारवाई केली जात नसल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
शासनाची परवानगी घेऊन 164 मधून माती काढली जात आहे. सचिन पाटील यांनीदेखील माती उत्खननासाठी परवानगी घेतली होती. परंतु, येण्या-जाण्यासाठी जागा नसल्याने परवानगी नाकारण्यात आली आहे. सर्व्हे नं. 119 ब मधील जागा गाव पंचाची आहे. त्यात सचिन पाटील यांच्या आजोबांचे नाव आहे. पंच वारस नोंद लावता येत नाही. त्यामुळे सचिन पाटील यांचा जागेवर अधिकार नाही.
– रविकांत जाधव, मंडळ अधिकारी