बेकायदेशीर वाळूउपसा करणार्‍यांना महसूलचा दणका

सहा जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

। महाड । प्रतिनिधी ।
वाळूउपसा करण्यासाठी कोणताही परवाना नसताना महाड तालुक्यातील जुई येथे सावित्री नदीतून बेकायदेशीर वाळूउपसा करणार्‍या सहा जणांवर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत वाळूउपसा करणार्‍यांकडून एक होडी व वाळू असा पाच लाख सहा हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
महाड तालुक्यात खाडे विभागात असलेल्या सावित्री नदीकिनारी जुई बुद्रुक या गावामध्ये वाळूउपसा केला जात असल्याची माहिती महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांना मिळाली होती. त्यांनी नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, जुईचे तलाठी ऋषिकेश भोसले व इतर कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत 26 मार्चला पहाटे तीन वाजता या ठिकाणी छापा टाकला. ?
यावेळी सावित्री नदीतून अनधिकृतरित्या वाळूउपसा करून पर्यावरणाचा र्‍हास केला जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. येथील अनवर सादिक दुस्ते (रा. जुई) यांच्यासह या ठिकाणी काम करणार्‍या सहा जणांवर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल विभागाने सहा ब्रास वाळू नेऊ शकणारी पाच लाख रुपये किमतीची होडी व एक ब्रास वाळू असा पाच लाख सहा हजार बत्तीस रुपयांचा माल ताब्यात घेतला आहे. याबाबत जुई येथील तलाठी ऋषिकेश भोसले यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Exit mobile version