आमटेम-निगडेच्या खाडीत अवैध वाळू उत्खनन?

| पेण | प्रतिनिधी |

आमटेम-निगडे खाडीत राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू आहे. आमटेमच्या पुलाच्या दोन्ही बाजूला खाडीत सक्शन पंप आणि बोटी सर्रासपणे दिसून येतात. मात्र, सरकारी बाबू व खाकीवाल्यांना हे दिसतनाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे हे उत्तम प्रशासक म्हणून सर्वसामान्यांसमारे येत असताना आमटेम-निगडेच्या खाडीमध्ये सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन बंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या जिल्हाधिकारी महसूल विभाग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा वाळूमाफिया उठवत असल्याची चर्चा आहे.

आमटेम-निगडेच्या खाडीमध्ये सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन तलाठी का बंद करू शकत नाही? अशा प्रकारची चर्चा सध्या जोरात आमटेम, निगडे, कासू, पांडापुर, शिहू, बेणसे, शहाबाज, वडखळ परिसरात सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आमटेम-निगडेच्या खाडीमध्ये सुरू असणार्‍या या अवैध उत्खननामागील खरा सूत्रधार हा राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याच्या भाच्याचा मित्र असल्याचे बोलले जाते. एकीकडे दादर-रावे परिसरात परंपरागत उदरनिर्वाहासाठी हातपाटी व्यवसाय करणार्‍या सर्वसामान्य गावकर्‍यांना बुडी मारून नियमबाह्य जास्त वाळू काढल्यास कारवाई केली जाते. मात्र, हजारो ब्रास वाळूचे उत्खनन रोजच्या रोज होत असताना हे महसूल प्रशासनाला दिसू नये अथवा दिसून त्याकडे पाहू नये असे का घडते, असा सवाल केला जात आहे. यात पोलीसच वाळूमाफियांना मतद करीत असावेत, असा संशय नागरिक बोलून दाखवत आहेत. एका गाडीमागे रूपये एक हजार मोजले जात असल्याची चर्चा होत असते. दर दिवसाला कमीत कमी 8 ते 10 डंम्पर वाळू आमटेम-निगडेच्या खाडीवरून जात आहे.

दरम्यान, येथे असणारी तलाठी महिला असल्याने त्यांचे वाळूमाफियांसमोर त्यांच काही चालत नसून, मंडळ अधिकारी हे सतत गैरहजर असल्याने या वाळूमाफियांचे फावत असल्याची चर्चा आहे. तरी, या वाळूमाफियांवर वेळीच महसूल खात्याने लगाम घालणे गरजेचे आहे. या वाळू उत्खननाविषयीदेखील उलट-सुलट चर्चा होत आहेत.

Exit mobile version