| रत्नागिरी | प्रतिनिधी |
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली बावनदी पात्रामध्ये गेल्या महिन्यापासून अवैध वाळूउपसा होत आहे. वाळूचे ढीग ही नदीपात्रालगत दिसून येत आहेत. याबाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ 26 जानेवारीला उपोषणाच्या पावित्र्यात आहेत.
महसूल विभागाच्या आशीर्वादामुळे राजरोसपणे वाळूउपसा होत आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. बुरबी घोडदे वाकी, सेवर कोंड पातळी, आंगवली मार्लेश्वर मंदिर शेजारी आणि बीएसएनएल टॉवरशेजारी नदीपात्रात वाळूउपसा केला जात आहे. वाळूउपसा राजकीय नेते व महसूल विभाग यांच्या आशीर्वादानानेच होत असल्याची बोलले जात आहे. देवरुख, मारळ, बामणोली, हातीव, कासार कोळवण, निवे खुर्द, साखरपा, वांझोळे पंचक्रोशीमध्ये ट्रक व डम्परच्या सहाय्याने दिवसा व रात्री वाळू नेली जात आहे. तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळेच हा वाळूउपसा होत आहे, अशी चर्चा आहे. याबाबत निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. येत्या 26 जानेवारी रोजी देवरुख तहसील कार्यलयासमोर उपोषण करून जाब विचारला जाणार आहे. वाळू उपशामुळे आंगवली बावनदी पात्राची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून आंगवली पंचक्रोशी तसेच गोठने पुनर्वसन शेजारी मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत आहे.