निगडे-आमटेमच्या खाडीत अवैध वाळू उत्खनन?

| पेण | प्रतिनिधी |
आमटेम-निगडे खाडीत राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू आहे. आमटेमच्या पुलाच्या दोन्ही बाजूला खाडीत कित्येक संक्शन पंप असलेल्या होड्या सर्वसामान्यांना दिसतात. मात्र, सरकारी बाबू व खाकीवाल्यांना हे दिसत नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर हे उत्तम प्रशासक म्हणून सर्वसामान्यांसमोर येत असताना निगडे-आमटेमच्या खाडीमध्ये सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन बंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या अवैध उत्खननामागील खरे सूत्रधार हे संतोष, नरेश, हरिश्‍चंद्र, सचिन म्हात्रे ही मंडळी असल्याचे बोलले जाते. एकीकडे दादर-रावे परिसरात परंपरागत उदरनिर्वाहासाठी हातपाटी व्यवसाय करणार्‍या सर्वसामान्य गावकर्‍यांना बुडी मारून नियमबाह्य जास्त वाळू काढल्यास कारवाई केली जाते. मात्र, हजारो ब्रास वाळूचे उत्खनन रोजच्या रोज होत असताना, हे महसूल प्रशासनाला दिसू नये अथवा दिसून त्याकडे पाहू नये असे का घडते, असा सवाल केला जात आहे. यात पोलीसच या वाळूमाफियांना मदत करीत असावेत, असा संशय नागरिक बोलून दाखवतात. एका गाडीमागे रूपये दोन हजार मोजले जात असल्याची चर्चा होत असते. दर दिवसाला कमीत कमी 15-20 डंपर वाळू निगडे-आमटेमच्या खाडीवरून जात आहे.

या निगडे-आमटेम खाडीतील वाळू उत्खननामुळे धरमतर खाडीच्या बाह्यकाठाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मोठमोठाल्या खांडीदेखील गेल्या आहेत. त्यामुळे कासू, पांडापुर, निगडे या विभागात जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर असून, पिकत्या जमिनींमध्ये खारफुटीची झाडे वाढू लागली आहेत. वेळोवेळी पेण तहसील कार्यालयात येथील शेतकर्‍यांनी तक्रारी करुनदेखील आजपर्यंत त्या खांडीदेखील बांधल्या गेलेल्या नाहीत. त्यातच आत्ता नव्याने होणार्‍या उत्खननामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. वेळीच या वाळूमाफियांना आवर घातली नाही. तर धरमतर खाडीचा बाह्यकाठ नष्ट होऊन भरतीचे पाणी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Exit mobile version