जगबुडी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन

महसूल विभागाचे दुर्लक्ष
रिपाईच्या वतीने कारवाईची मागणी

। खेड । प्रतिनिधी ।

पर्यावरणाच्या कारणास्तव खेड तालुक्यात कोणत्याही प्रकारच्या उत्खननाला शासनाने बंदी घातली आहे. मात्र शासनाच्या या आदेशाला धाब्यावर बसवून खेड मटणमार्केट येथील जगबुडी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन केले जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
याप्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे महसूल विभागाचे या उत्खननांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, महसूलच्या वरदहस्ताखालीच हा गोरख धंदा सुरु आहे कि काय अशी शंका जनसामान्यांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
पर्यावरणाचा होणारा र्‍हास रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी खेड तालुक्यात उत्खननाला बंदी घालण्यात आली. यामुळे तालुक्यातून वाहणार्‍या जगबुडी नदीपात्रात केल्या जाणार्‍या वाळू उत्खननावर निर्बंध आले. मात्र तरीही काहीजण निलिक, अळसुरे, खेड शहर या ठिकाणी वाळू उत्खनन करून त्या वाळूची वाहतूकही करत आहेत.
शासनाची रॉयल्टी बुडवून अशा प्रकारे वाळू उत्खनन करणे हा कायदयाने गुन्हा आहे. महसूल तसेच खनिकर्म विभागाने अशा व्यवसायिकांवर कारवाई करणे गरजेचे आहे मात्र महसूल किंवा खनिकर्म विभागाकडून अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात असल्याने खाडीपात्रात अवैध वाळू उत्खन करून वाळूचे बिनबोभाटपणे वितरणही केले जात आहे.
खेड तालुक्यातून वाहणार्‍या जगबुडी नदीपात्रात ठिकठिकाणी वाळू उत्खनन केले जाते. रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत हा गोरख धंदा केला जातो. पूर्णपणे अवैध असलेल्या या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते.

Exit mobile version