मुंबई रेशनिंग विभागाची धडक कारवाई
। मुंबई । प्रतिनिधी ।
कोणत्याही विभागाची परवानगी न घेता सिलेंडरची साठवणूक व विक्री करणाऱ्या डोंबिवलीच्या पाच गॅस कंपन्यांवर मुंबई रेशनिंग विभागाच्या दक्षता पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत 67 लाख 14 हजार 833 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गॅसची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द शिधावाटप अधिकारी दिपक डोळस यांनी मानपाडा पोलीस स्टेशन, डोंबिवली एम.आय.डी.सी., जिल्हा ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे शिधावाटप क्षेत्रात पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम द्रव पदार्थ व लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस यांचे वितरण सुरळीत होणे तसेच त्यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही, याकरीता नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे मार्गदर्शनाखाली दक्षता पथक गठित करण्यात आलेले आहे. या दक्षता पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.11) मुंबई रेशनिंग विभागाचे दक्षता पथक गस्तीवर असताना त्यांना सर्वे नंबर 80/2, पिंपळेश्वर महादेव मंदिरजवळ, एम.आय.डी.सी. फेज-2, डोंबिवली (पूर्व) या ठिकाणी बंद पडलेल्या वाहनांमध्ये तसेच अवैध गोदामवजा शेडमध्ये विविध कंपन्याचे घरगुती व व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर साठवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले.
हा परिसर डोबिंवली एम.आय.डी.सी. झोनमध्ये असून मोकळ्या जागेत कोणत्याही विस्फोटक विभागाची, अग्निशमक विभागाची अथवा कोणत्याही कंपनीची परवानगी घेतली नसल्याचे तसेच कोणतीही कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. अवैध, विनापरवाना, अतिज्वलनशील पदार्थाची साठवणूक होत असल्याचे व ज्वालाग्राही गॅसची गळती होऊन मोठ्या प्रमाणात वित्तहानी व जिवीतहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अधिकारी व पंचानी याबाबत पंचनामा करुन अक्षया गॅस एजन्सी, मधुकृष्ण गॅस एजन्सी, स्वराज गॅस डिस्ट्रीब्युटर, तृप्ती गॅस एजन्सी व लकी एंटरप्राईजेस यांचे एकूण १८३९ गॅस सिलेंडर व ७ बंद अवस्थेतील वाहने असा मोठा साठा जप्त केला. तसेच मानपाडा पोलीस स्टेशन, डोंबिवली एम.आय.डी.सी., जिल्हा ठाणे येथे संबंधित एजन्सीचे मालक/गोदाम कीपर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन एकूण रुपये 67 लाख 14 हजार 833 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमध्ये गॅसची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द शिधावाटप अधिकारी दिपक डोळस यांनी मानपाडा पोलीस स्टेशन, डोंबिवली एम.आय.डी.सी., जिल्हा ठाणे येथे फिर्याद नोंद केली. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालयाचे फिरते पथकातील शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, राजेश सोरते, विकास नागदिवे, देवानंद थोरवे, पवन कुंभले व रविंद्र राठोड तसेच शिधावाटप कार्यालय क्र. 39 फ डोंबिवली (पूर्व) येथील शिधावाटप अधिकारी दिपक डोळस, सहायक शिधावाटप अधिकारी संदिप चौधरी, शिधावाटप निरिक्षक संतोष संसारे व राजीक शेख तसेच मानपाडा पोलिस ठाणे, ठाणे शहर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
