गोरेगाव, लोणेरेमध्ये अवैध धंदे तेजीत

पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे
माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यात गोरेगाव व लोणेरे याठिकाणी गोरेगाव पोलिसांच्या आशीर्वादाने मटका धंदा रूपाने अवैध धंदे तेजीत सुरू असून, याकडे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे तसेच महामार्गावरील लोणेरे येथे पेट्रोल पंपाच्या शेजारी एका गल्लीत कल्याण व मेन नावाने मटक्यासारखा अवैध धंदा तेजीत सुरू आहे. लोणेरेतील या अवैध धंद्यानिमित्त मध्यंतरी लोणेरे ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यावर येथील महिलांनी हे धंदे बंद करा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा आणू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल त्यावेळी गोरेगाव पोलिसांनी घेऊन लोणेरे व गोरेगाव येथील अशा प्रकारचे अवैध धंदे काही महिने बंध केले होते. पुन्हा 15 ऑगस्टपासून गोरेगाव पोलिसांच्या आशीर्वादाने याठिकाणी हे धंदे सुरू झाले आहेत.
गेल्यावर्षी माणगाव तालुक्यातील एका गावात गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून जुगार खेळणार्‍या अनेकांवर कारवाई केली होती. माणगाव तालुक्यात माणगाव शहरात हे अवैध धंदे बंद असून, गोरेगाव व लोणेरेत हे धंदे सुरू कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संसार उद्ध्वस्त
मटका खेळल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, कॉलेजमधील तरुणांचा कलही या खेळाकडे आहे.तसेच गौरी-गणपती सण काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे असे जुगाराचे प्रकार सुरू राहिल्यास आणखीनच अवैध धंदे वाढणार आहेत.
मोर्चाचा इशारा
गेल्या तीन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी अवैध धंद्याबाबत कडक धोरण स्वीकारित रायगडातील सर्वच अवैध धंदे बंद केले होते. मात्र, त्यांची बदली झाल्यावर पुन्हा हे अवैध धंदे रायगडात डोकेवर काढीत असून, माणगाव तालुक्यातील गोरेगाव व लोणेरे याठिकाणी हे अवैध धंदे सुरू आहेत. हे अवैध धंदे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ताबडतोब बंद न केल्यास याबाबत भव्य मोर्चा गोरेगाव पोलीस ठाण्यावर काढण्यात येईल, असा इशारा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Exit mobile version