। पनवेल । वार्ताहर ।
खारघर तसेच तळोजा फेज-1 आणि फेज-2 मध्ये रस्ते आणि मोकळ्या मैदानावर पनवेल महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता आठवडा बाजार भरविला जात आहे. विशेष म्हणजे खारघर सेक्टर-19 मुर्बीगाव लगत सिडकोने गाव आणि परिसरातील रहिवाशांसाठी उद्यानाकरिता राखीव जागा सोडली असून जागे सभोवती संरक्षण जाळी उभारली आहे. मात्र, खारघर आणि तळोजा परिसरात बेकायदेशीरपणे उद्यानासाठी राखीव जागेत तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला कब्जा करून आठवडा बाजार भरविला जात आहे. या आठवडा बाजारात गोवंडी, मानखुर्द, मुंबई येथून फेरीवाले येत असतात. या अनधिकृत आठवडा बाजारामुळे होणारी गर्दी व चोर्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत आहे. तसेच, पनवेल महापालिका प्रशासनाकडून बेकायदा आठवडा बाजाराकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे स्थानिक रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.