| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायतीचे स्वतःच्या मालकीचे तलाव आहे. हे तलाव मनोरंजनाचे ठिकाण म्हणून समजले जाते. परंतु, या तलावाजवळील कोपऱ्यातील झुडपांत एक झोपडी बांधण्यात आली असून, त्यात गादी देखील ठेवण्यात आली आहे. ही झोपडी अनैतिक धंदे करण्यासाठी उभारली असल्याचे उघड झाले असून त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
नेरळ ग्रामपंचायत मालकीचे राजमाता जिजामाता नावाचे तलाव आहे. हे तलाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी बाजूलाच असून, या ठिकाणी पहाटे 5.00 वाजल्यापासून वर्दळ सुरू होते. नेरळ गावातील मनोरंजनाचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे राजमाता जिजामाता तलाव परिसर अनेक बाबींसाठी गाजू लागला आहे. निवडणूक काळात या ठिकाणी लिंबू, नारळ, लाल कापड व टाचण्या यांचा वापर करून जादूटोणा करण्याचा प्रकार समोर आला होता. तसेच, या ठिकाणी दुपारच्या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आंबटशौकीन यांची गर्दी असायची. याबाबत समाज माध्यमांवर चर्चा सुरू झाल्यावर नेरळ ग्रामपंचायतीकडून सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावण्यात येत होते. परंतु, ग्रामपंचायत प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे आंबटशौकीनांचे चाळे पुन्हा सुरू झाले असून दुपारच्या वेळी या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येते.
दरम्यान, तेथील एका निर्मनुष्य जागी चक्क झोपडी उभारण्यात आली आहे. त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या कापून त्या जमिनीत खड्डे खोदून उभ्या करण्यात आल्या असून त्या सर्व फांद्यांना जुन्या साड्या गुंडाळल्या आहेत. तसेच, त्या झोपडीमध्ये मध्यभागी एक गादी देखील ठेवण्यात आली असून तेथे महिलांचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत आहेत. त्यामुळे या झोपडीचा वापर अनैतिक धंदे करण्यासाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा झोपड्या कोणी आणि कशासाठी उभारल्या, याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे. या ठिकाणी विजेचे पथदिवे असून आणि ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी देखील तेथे असताना अशा झोपड्या निर्माण होतात? याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
नेरळच्या तलावाजवळ अनैतिक धंदे
