मुंबईत मविआची वज्रमूठ बळकट
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात महाविकास आघाडीची वज्रमूठ आणखी घट्ट करण्याचा निर्धार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रविवारी (1 मे) मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर केला. या सभेत सर्वच नेत्यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात मविआची सत्ता आल्यास जनतेला मोफत रेशन, वीज, शिक्षण देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 6 मे रोजी आपण बारसूला जाणार आहे. हिम्मत असेल तर रोखून दाखवा,असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.
ठाकरे यांनी आपल्या भाषणातून शिंदे, फडणवीस सरकारवर शेलक्या भाषेत प्रहार केले. मी 6 मे रोजी बारसूला जाणार आहे. बारसूतल्या लोकांशी बोलणार. तुम्ही मला रोखून दाखवा, बारसू हा काही काही पाकव्याप्त काश्मीर नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हे लोक माझ्या नावाचं पत्र नाचवतायत. उद्धव ठाकरेंनीच ही जागा सूचवली असं पत्र दाखवतायत. परंतु मी त्या पत्रात कुठे लिहिलंय का तिथे पोलिसांना घुसवा, शेतकर्यांवर लाठ्या चालवा, गोळ्या झाडा पण रिफायनरी करा, असं पत्रात कुठे लिहिलंय. असेही त्यांनी निदर्शनास आणले. हिंदूत्व सोडणार नाही, ते आमचे राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपला मानतो ते मला वडिलांनी शिकविले तेच आमचे हिंदूत्व आहे, असे ते म्हणाले.
मन की बातला अजितदादांची बगल
या सभेत अजित पवार यांनी मन की बात ला बगल देत शिंदे, फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप केला. माझ्यासह अन्य नेत्यांबाबत काहीही चर्चा विनाकारण घडविल्या जात आहेत. मात्र, त्यात कुठल्याही चर्चेत तथ्य नाही, असे सांगून त्यांनी आपण मविआतमध्ये राहणार असल्याचे सुचित केले. भाजपवर निशाणा साधताना काही जणांना फोडण्याचं राजकारणं झालं. यामुळं संविधान, कायदा योग्य स्थितीत राहणार आहे का? याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे, असा सवालही केला. कोणत्याही निवडणुका असोत मविआनं चांगल्या पद्धतीनं यश मिळवलं आहे. जनता आपल्या बाजूनं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र येत या सर्वांशी मुकाबला करण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईचं मराठीपण टिकवण्यात, मान सन्मान देशाच्या कानाकोपर्यात वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले. आणखी एक महत्त्वाचं काम त्यांनी केलं. ते म्हणजे शिवसेनेमुळे मुंबई टिकली. मुंबईत मराठी माणसाचा अभिमान, मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला. बाळासाहेबांमुळे मराठी माणूस एकजुटीने राहिला. हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. परंतु हेच नेमकं काहीच्या डोळ्यांवर यायला लागलं. म्हणून काही लोकांना फोडण्याचं राजकारण झालं, असेही दादांनी स्पष्ट केले.
मनपाच्या फिक्स डिपॉझिटवर डोळा
भाजपाल मुंबई महापालिका कशाला हवी आहे, तर यांना मुंबई महापालिकचे फिक्स्ड डिपॉझिट तोडायचे आहेत. मुंबई मनपा विकासासाठी नव्हे, तर पैशांसाठी हवी आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. उद्धवजींच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात आपल्या मेहनतीने आपण सर्वांनी महापालिका सक्षम केली. मुंबईचा विकास केला. उद्धवजींच्या काळात घेतलेल्या निर्णयांमुळे मुंबईला ताकद मिळाली. आता यांना 92,000 कोटी दिसत आहेत. हे पैसे आपल्याला कसे वापरता येतील याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे, असे ते म्हणाले.
रिफायनरीमुळे विकास अशक्य- पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारसू रिफायनरीचा मुद्दा घेत शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. बारसू रिफायनरीवरवरून राज्यातलं वातवरण तापलं आहे. एकीकडे स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. तर राज्य सरकारने प्रकल्प लावून धरला आहे. कोकणच्या विकासासाठी, तिथल्या तरुणांच्या रोजगारासाठी हा प्रकल्प असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जात आहे. पंरतु या प्रकल्पाद्वारे कोकणचा नव्हे तर यांच्या (भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट) बगलबच्च्यांचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बारसूतली जमीन मोठ्या प्रमाणात यांच्या बगलबच्च्यांनी घेतली आहे. असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.