बारा छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची निवड
| अलिबाग | प्रतिनिधी |
तीन छायाचित्रकारांच्या पुढाकाराने इमेज कॅलेंडरची निर्मिती करण्यात आली आहे. 2024 या कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा बुधवारी दि.27 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉल मधील पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. इमेज कॅलेंडरमध्ये निसर्ग अन सणांची छबी अवतरल्याने ते एक वेगळे आकर्षण ठरणार आहे.
इमेज कॅलेंडर आयोजित छायाचित्र स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष आहे. जिल्ह्यातील हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांच्या कलेला वाव देण्यासाठीची परंपरा इमेज कॅलेंडरने कायम ठेवली आहे. यंदाही 2024 च्या वार्षिक कॅलेंडरसाठी निसर्ग छायाचित्रांबरोबरच पारंपरिक सणांची छायाचित्र यांनाही स्पर्धेत संधी देण्यात आली होती. जिल्ह्यातील शेकडो छायाचित्रांमधून 12 छायाचित्रांची निवड मान्यवर परीक्षकांमार्फत करण्यात आली आहे. त्यात आकाश थळे, अमेय नाझरे, अमोल नाईक, अंजली ठोकळ, अतुल वर्तक, अतुल झेंडे, महेश मुसळे, निलेश दुदम, पौर्णिमा रोकडे, समीर भायदे, तुषार थळे आणि विकास पाटील यांच्या छायाचित्राची निवड करण्यात आली आहे. 2024 च्या इमेज कॅलेंडरमध्ये रायगड जिल्ह्यातील निसर्ग आणि पारंपरिक सण यांची छबी अवतरलेली पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेल्या शेकडो छायाचित्रांमधून कॅलेंडरसाठीच्या बारा पानांसाठी निवड करणे जिकरीचे होते. यासाठी इमेज कॅलेंडर संस्थेने त्यांच्या परीक्षणानंतर बारा छायाचित्रणाची निवड करण्यात आली आहे. क्रमांकानुसार कॅलेंडरच्या पहिल्या पानावरुन छायाचित्रकारांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती इमेज कॅलेंडरचे संस्थापक रमेश कांबळे, जितू शिगवण आणि समीर मालोदे यांनी दिली आहे.
