जखमी वासरावर तातडीने उपचार

| मुरूड | वार्ताहर |

नांदगावच्या श्री सिद्धिविनायक देवस्थानानजिकच्या एका निर्मनुष्य गल्लीत एक गाय व तिचा वासरु काही खाद्य मिळते का… ते बघत फिरत असताना अचानक भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने वासराला जोरात धडक दिली. या धडकेने त्या लहानग्या वासराच्या पायच फ्रॅक्चर झाला. त्याला उठता येईना ते रस्त्यावर निपचीत पडून राहिले. त्याची माता (गाय) बिचारी आपल्या वासराचे रक्षण करीत उभी होती.

नांदगाव मधील निशिकांत खोत, शैलेंद्र दिवेकर, जितेंद्र दिवेकर आदींचे या जखमी वासराकडे लक्ष जाताच त्यांच्यातील भूतदया जागृत झाली व त्यांनी लागलीच नांदगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात धाव घेतली. दवाखान्यातील कर्मचारी जितेंद्र गावंडे यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली व माऊली मेडिकलचे मालक शैलेंद्र दिवेकर यांनी आपल्या मेडिकल मधील आवश्यक ती औषधे व साहित्य मोफत पुरवून वासरावर उपचार करून पाय प्लास्टरमध्ये टाकून त्यास सुरक्षित स्थळी हलविले व आजच्या एकविसाव्या शतकातील अति जलद जमान्यातही प्राणी मात्रांबद्दलची भूतदया अद्यापही जागृत असल्याचे दाखवून दिले.

विशेष म्हणजे या वासराची गोमाता वेळ झाल्यावर तेथे येऊन आपल्या पिल्लाला दूध पाजण्यासाठी येत आहे हे दृश्य पाहून अनेकांना मनुष्यच नव्हे तर मुक्या प्राण्यांतीलही आई आणि तिच्या मुलाच्या घट्ट नात्याचे हृद्य दर्शन घडत आहे.

Exit mobile version