उद्या होणार गौरी-गणपतीचं विसर्जन; प्रशासनाने केली तयारी

| अलिबाग | प्रतिनिधी |
मंगलमय व आनंदमय वातावरणात बाप्पा व गौराईची प्रतिष्ठापना करून मनोभावे पुजा, आरती करण्यात आली. अबाल वृध्दांपासून बच्चे कंपनी, महिलांनी उत्साहाच्या वातावरणात गणपती बाप्पा व गौराईची सेवा केली. प्रत्येकामध्ये एक वेगळा आनंद उत्साह दिसून आला. पाच दिवसाच्या बाप्पाला, गौराईला शनिवारी जड अंतःकरणातून भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. रायगड जिल्हयातील 73 हजार 195 गौरी- गणपतीचे विसर्जन, तलाव, नदी, समुद्र व कृत्रीम तलावामध्ये करण्यात येणार आहे. विसर्जनाच्यावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज आहे.

रायगड जिल्हयामध्ये एक लाखाहून अधिक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी झाली. तसेच 14 हजार 4455 गौराईची प्रतिष्ठापना गुरुवारी झाली.गेली पाच दिवस जिल्हयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गणपतीच्या वेगवेगळ्या गाण्यांवर नाचत बागडत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काही ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी धावऱ्या नाच या पारंपारिक नृत्याबरोबरच, कुस्ती स्पर्धांचेही आयोजन केले. या सर्व कार्यक्रमांचा आनंद गणेश भक्तांनी मनमुरादपणे घेतला. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच स्तरातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून, अलिंगण देऊन, हात मिळवून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर महिला वर्गांनीदेखील गौराईच्या आगमनाचे स्वागत जल्लोषात केले. वस्त्रालंकाराचा साजशृंगार चढवून मुर्ती,व मुखवटयाची पुजा करण्यात आली.

नाचगाणी, फुगडया आदी खेळांनी जिल्हयात रंगत आणली. पारंपारिक नृत्याबरोबरच मनोरंजनात्मक, भजन किर्तनाचे धार्मिक कार्यक्रम घेऊन गौराईची मनोभावे पुजा करण्यात आली. शुक्रवारी सकाळपासून दिवसभर जिल्हयात धार्मिक व आनंदमय वातावरण निर्माण झाले. जिल्हयात गणेशमुर्तींसह गौरीची मुर्ती व मुखवटयांचे विसर्जन केले जाणार आहे.गौराई व गणपतीची मुर्ती डोक्यावर, गाडीवर नेऊन मिरवणूका काढल्या जाणार आहेत. काही ठिकाणी मिरवणूका, स्पीकर, खालू बाजे, बेंजोच्या तालावर काढल्या जाणार आहेत. 58 हजार 740 गणेशमुर्ती व 15 हजार 455 गौरीच्या मुर्ती व मुखवटयांचे विसर्जन केले जाणार आहे.

पोलीसांचा राहणार पहारा
अलिबाग पोलीसांच्यावतीने नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. एकूण 32 पोलीस तैनात असणार आहेत. त्यात चार अधिकारी, पाच अंमलदार व 25 होमगार्डची नेमणूक केली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बॅरीकेट लावले जाणार आहेत. एसटी स्थानक, बालाजी नाका, ते समुद्रकिनारी त्यानंतर विसर्जन झाल्यावर बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा येण्या जाण्याचा मार्ग ठेवला आहे.नागरिकांनी अतिउत्साहीपणा न करता आनंदात व मंगलमय वातावरणात विसर्जन सोहळा साजरा करा असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले आहे.

अलिबाग किनारी कृत्रिम तलाव
अलिबाग नगरपालिकेच्यावतीने बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे .समुद्रकिनारी अलिबाग नगरपालिकेच्यावतीने मदत केंद्र उभारले आहे. अलिबाग नगरपरिषदेने यंदा कृत्रिम तलाव उभारले आहे. दीड दिवसाच्या गणेशमुर्तींचे विसर्जन करताना कृत्रिम तलावांला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 46 गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. या वाढत्या प्रतिसादानुसार यंदा गौरी – गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठीदेखील कृत्रिम तलाव खुले केले आहे. नगरपरिषदेचे 30 कर्मचारी नियुक्त केले आहेत. समुद्रात विसर्जन करण्यासाठी 40 जीव रक्षक, पाच बोटी, तसेच ठिकठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. किनाऱ्यापासून 250 मीटर अंतरावर विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीसांचे मदत केंद्र उभारण्यात आले निर्माल्य गोळा करण्यासाठी ट्रॉली व ट्रक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. मुर्तीचे विसर्जन झाल्यावर निर्माल्य कुठेही न टाकता निर्माल्य संकलन ठिकाणी टाकण्यात यावे असे आवाहन केले जाणार आहे. अलिबाग नगरपरिषद प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपरिषगदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी केले आहे.

Exit mobile version