रायगडात दहा दिवसांच्या बाप्पांचे जयघोषात विसर्जन

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया या गजरात शुक्रवारी गणरायांची स्थापना करण्यात आली होती. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… गणपती गेले गावाला …चैन पडेना आम्हाला या गजरात रायगडात दहा दिवसांच्या गणरायाला अनंत चतुर्थीला शुक्रवार (दि.9) भावपूर्ण निरोप देण्यात आला. अनेकांनी पारंपरिक पद्धतीने कोव्हिड नियमांचे पालन करीत उत्साहात हा गणेशोत्सव साजरा केला. यावर्षीही विशेष करून ग्रामीण भागात अनेक गणेशभक्तांनी वाजत, गाजत, नाचत गणरायाची विसर्जन मिरवणूक काढली.

सुधागडात बाप्पांना साश्रु नयनांनी निरोप
| पाली/बेणसे । वार्ताहर ।

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली सुधागडात गणेशोत्सवा ची धामधूम पहावयास मिळते. यंदा गणेशोत्सव सण धुमधडाक्यात साजरा करण्यात आलाय. गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांसह वाद्यवृदांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला पालीसह सुधागडात शुक्रवारी दि.(09) रोजी साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. पालीसह जांभुळपाडा, परळी व शेकडो गावे वाड्यावस्त्यात, आदवासीवाड्यापाड्यात सर्वत्र गणरायाचाच गजर ऐंकू येत होता. पुजापाठ, आरती, भजन, किर्तन, संगित आदिंसह विविध प्रबोधनात्मक व समाजपयोगी उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेशोत्सव मंडळासह गणेशभक्तांनी भर देत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक ठिकाणी निसर्ग व पर्यावरण पूरक गणेशोत्सवाबरोबर देशभक्ती व राष्ट्रप्रेमाची भावना जपत गणेशोत्सव मंडळांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देखावे व सुरेख सजावट, आकर्षक रोषणाई केल्याचे पहावयास मिळाले.विसर्जन समयी ढोल ताशे, बेंजो पथकासह वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान थोरांसह महिला तरुण वर्गाने वाद्य वृदांच्या तालावर ठेका धरला होता, मिरवणुकीत गुलालाची उधळण व फटक्यांची आतिषबाजी देखील मिरवणूक रंग भरत होती. पोलीस निरिक्षक विश्‍वजीत काइंगडे यांनी चोख व कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

कर्जतमध्ये 1121 गणरायांना भावपूर्ण निरोप
|कर्जत । वार्ताहर ।


कर्जत तालुक्यात अनंत चतुर्दशीला 1121 गणरायाना भावपूर्ण निरोप देण्यात आला. भाविकांनी नदी तसेच गावाजवळ असलेल्या तलाव व ओढ्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करीत बाप्पाला निरोप दिला. यंदाही गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक 9, खासगी 424 नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खासगी 663 आणि माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खासगी 25 अशा एकूण 1121 गणेशमूर्तींचे पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात विसर्जन करण्यात आले. नगरपरिषद क्षेत्रात विसर्जन ठिकाणी नगरपरिषदेने नदीत निर्माल्य टाकून पाणी दूषित होऊ नये म्हणून निर्माल्य एकत्र करण्यात येत होते.अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला, स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय डोंबे विद्या निकेतन, विद्या विकास मंदिर, जनता विद्या मंदिर, शिशु मंदिर या शाळांमधील विद्यार्थ्यांनी लेझीम, कवायत सादर केली.पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता.

माथेरानमध्ये गणेशोत्सवाची सांगता
। माथेरान । वार्ताहर ।


चैतन्यमय वातावरणात सुरू झालेला गणेशोत्सव सोहळ्याची आज अनंत चतुर्दर्शीला गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर याच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देत मंगल सोहळ्याची सांगता झाली.
दहा दिवस गणरायाला अभ्यंग,पंचामृत,धूप,दीप,मोदकांचा नैवैद्य असा भक्तांचा पाहुणचार घेऊन श्रीगणेशाने निरोप घेतला.संध्याकाळी विसर्जनस्थळी गणपती बाप्पा मोरया ,पुढल्या वर्षी लवकर या अशा जयघोषात गणपतींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. माथेरानमध्ये अजूनही जुन्या परंपरेनुसार पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते. टाळ मृदंगाच्या व गणेश गीतांच्या सुरात, गणपती बाप्पा डोक्यावर घेऊन एका रांगेत ही मिरवणूक बाजारपेठेतून विसर्जनस्थळाकडे निघाली. या मिरवणूकीमध्ये आणि विसर्जनस्थळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याच बरोबर विसर्जनस्थळी माथेरान नगरपालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित होते. गणेश भक्तांनी देखील चांगले सहकार्य केल्यामुळे विसर्जन सोहळा आनंदात व अगदी शांततेत पार पडला.

दिवेआगरमध्ये गणेशभक्तांची अलोट गर्दी
| दिघी । वार्ताहर ।


गेल्या दहा दिवसांपासून घराघरामध्ये विराजमान असलेल्या बाप्पाचे शुक्रवारी (ता. 9 ) रोजी तितक्याच भक्तीभावात विसर्जन करण्यात आले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जन मिरवणुकीत भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बोर्लीपंचतन परिसरात सार्वजनिक 1 तर 1223 घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेले दहा दिवस ज्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली, त्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आलं. विशेष म्हणजे कोकणातील घरगुती गणेशोत्सव वैशिष्ट्येपूर्ण उत्साहात साजरा होतो. त्यामुळे यावर्षी विघ्नहर्त्याच्या कृपेने कोरोना संकटातुन मुक्त होऊन सर्वत्र गणेशोत्सवात भजन, किर्तन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. तर यावेळी सार्वजनिक मंडळाला महिला भजन, प्रासादिक भजन, सामाजिक सत्कार, गरजू विध्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप व महा रक्तदान शिबिरा सोबत विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा घेण्याची संधी मिळाली. स्तुत्य उपक्रमातील 31 वा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप पोमन सोबत पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विर्सजन सोहळा र्निविघ्न पार पाडण्यासाठी पोलिस, व जीवरक्षक तैनात होते.

नागोठणा परिसरांत भावपूर्ण निरोप
| नागोठणे । वार्ताहर ।


गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला असा जयघोष करीत नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे शहर व परिसरांतील अनंत चतुर्दशीच्या 220 खासगी व 9 सार्वजनिक गणपती बाप्पांना शुक्रवारी (दि. 9) भावपूर्ण निरोप देण्यात आला. दोन वर्षांनी नागोठण्यातील अंबा विसर्जन घाट गणेश भक्तांनी फुलल्याचे यावेळी पहायला मिळाले. शहर व ग्रामीण भागात आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच सुरुवात झाली होती. नागोठणे शहर व परिसरांत पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात वाजत, गाजत, नाचत बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. नागोठणे व परिसरांत तलाव व अंबा नदी यामध्ये बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. अंबा घाटावर रात्री उशिरा 11.30 पर्यंत हे विसर्जन सुरु होते. पोलीस ठाण्याचे निरिक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे व परिसरांतील विसर्जन स्थळी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

एकदरा खाडीतून 124 बाप्पांचे श्री सदस्यांनी केले पुनर्विसर्जन
| मुरूड । प्रतिनिधी ।


मुरुड एकदरा खाडीतून सुमारे 124 प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीचे श्री सदस्यांनी पुनर्विसर्जन केले. पहाटे पाच वाजल्यापासून सुमारे 25 ते 30 श्री सदस्यांनी खाडीमध्ये विसर्जित केलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढण्यास सुरुवात केली. दोन तासाच्या अथक प्रयत्नाने मुरुड एकदरा खाडीतून 114 प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपतीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. बैठकीच्या माध्यमातून श्री सदस्य दरवर्षी या खाडीतील प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढून खोल समुद्रात नेऊन विसर्जित करीत आहेत. याही वेळेला हे गणपती काढण्यात आले हे सर्व गणपती दोन बोटीच्या सहाय्याने पद्मदुर्ग परिसरातील खोल समुद्रात नेऊन विसर्जन करण्यात आले. मुरुड एकदरा खाडी उथळ असल्याकारणाने पाण्याच्या ओटीला हे सर्व गणपती वरती येत असतात या मूर्तींचे विटंबना होऊ नये या उद्देशाने हे श्री सदस्य ही सेवा करीत असतात. शाडू माती पासून तयार होणार्‍या मूर्ती महाग असल्याकारणाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मातीच्या मूर्ती काही तासातच विरघळतात तर शाडू मातीच्या मूर्ती विरघळण्यासाठी 48 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे बैठकीच्या माध्यमातून नानासाहेब प्रतिष्ठान तर्फे श्री सदस्यांनी शाडू मातीच्या मूर्ती आणाव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणू नयेत असे आवाहन केले आहे.

Exit mobile version