महाड तालुक्यात भाताच्या जमीनीवर अमरवेल वनस्पतीचा विळखा

। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यामध्ये भाताचे पिक घेतले जाते. शेतकर्‍यांनी भाताचे पिक घेतल्या नंतर त्याच शेत जमीनीमध्ये कडधान्याची लागवड करण्यात येऊन पुरक उत्पन्न घेतले जाते, परंतु आर्थिक अडचणीमुळे या परिसरातील शेतकरी कडधान्याच्या लागवडीकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शेत जमीनीवर मोठ्या प्रमाणांत अमरवेल वनस्पती परसरत आहे. हा विळखा वाढत असल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर एक नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे.

अमरवेल ही परजीवी वनस्पती असुन औषधी देखिल आहे. पित्तविकार, चर्मरोग, अमांश, मुत्रविकार इत्यादीवर गुणकारी आहे. या वनस्पतीची वाढ होण्याकरीता कोणत्याही औषधाची अथवा मशागतीची गरज नसते. पिवळ्या आणि पोपटी रंगाचे शाखायुक्त वेलीचे जाळे असते ही वाढण्याकरीता कोणत्याही झाडाच्या खोडाची गरज नसते. ही इतर वनस्पतीवर वाढत असताना आपली लहान नाजुक शोषके इतर वनस्पतीच्या खोडामध्ये घुसवून पौष्टीक अन्न घटक शोषून घेते. त्यामुळे या वनस्पतीची वाढ अधिक वेगाने होते. घटक शोषुन घेत असल्याने येणार्‍या कडधान्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसुन येते.

या वनस्पतीच्या निर्मुलनाकरीता कोणतेही प्रभावी औषध अगर तणनाशक औषध बाजारांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे वेळोवेळी लक्ष देऊन अमरवेल ओढून काढणे आणि नष्ट करणे हाच एकमेव उपाय असल्याने शेतकरी या उपायाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या वनस्पतीचा विळखा वाढताना दिसुन येतो.

Exit mobile version