हवामानबदलाचा मासेमारीवर परिणाम

मच्छिमारांवर आर्थिक संकट
खवय्ये, पर्यटक मोठ्या मासळीच्या प्रतीक्षेत

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
यंदा परतीच्या पावसाने सर्व अंदाज फोल ठरवून चक्क दिवाळीतदेखील विजेच्या गडगडाटासह विविध भागात पाऊस कोसळला आहे. भातशेती आणि मासेमारीची या विचित्र वादळी पावसाने दैना उडविली असून, प्रचंड नुकसान सहन करण्यापलीकडे परिस्थिती गेली असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे. यामुळे गेल्या 15 दिवसांपासून मुरूड समुद्रातील मासेमारी पूर्णपणे ठप्पच आहे. संपूर्ण मासेमारी हंगाम सपशेल फेल झाल्याचे दिसून येत आहे.

एकदरा कोळी समाज अध्यक्ष तथा मुरूड तालुका मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी सांगितले की, 15 ते 20 दिवसांपासून येथील समुद्रात मोठी मासळी मिळत नसल्याने परगावची मासळी विक्रीसाठी येत आहे. येथील मच्छिमार मंडळींना मासळीचा हंगाम असूनही कोलंबीशिवाय मोठी मासळी मिळत नाही. त्यामुळे खवय्ये आणि पर्यटक हिरमुसल्याचे दिसत आहेत. सलग सुट्टी आणि दिवाळी सुट्ट्या असल्याने पर्यटकदेखील मोठ्या संख्येने येत आहेत. समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर मासेमारी पूर्वपदावर येईल हा अंदाजदेखील फोल ठरला असून, वादळी पावसाचे अरिष्ट अचानक येत असल्याने छोटी-मोठी मासेमारी बंद पडताना दिसून येत आहे.

राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छिमार धनंजय गिदी म्हणाले की, समुद्रात लाटा उसळत असल्या तरी मोठी मासळी मुबलक येण्यासाठी पाण्याची जी हालचाल हवी असते तशी नसल्याने सुरमई, कुपा, पापलेट अशी मासळी मिळत नाही. मागील 15 दिवसांपासून सर्व प्रकारची मासळी मिळणे बंद झाले आहे.त्या मुळे मच्छिमार हवालदिल आहे.

मच्छिमारांचा रोजगार वाढण्यासाठी समुद्रात मासेमारी क्षेत्र शासनाने वाढविणे गरजेचे आहे. येणार्‍या बंदर प्रकल्पामुळे मासेमारीस असलेले क्षेत्र कमी होत असल्याने किंवा निर्बंध येत असल्याने पुढील पिढीला रोजगार मिळणार कसा? याचा शासनाने गंभीरपणे विचार करावा. आधीच मासळी कमी मिळत आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमार भरडला गेलेला आहे.

– मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड मच्छिमार संघ
Exit mobile version