उरण तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात पर्यावरणाचा र्हास होताना दिसत आहे. या भागात दगड खाणी असून, त्याचा परिणाम आंबा पिकाबरोबर कडधान्य व भात पिकावरही झाला आहे. येथील ठेकेदारांनी दलालांना हाताशी धरून, शेतकर्यांच्या डोंगरप्रवण जमिनी खरेदी करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे एक-दोन वर्षातच येथील निसर्गसंपदा नष्ट होण्याचे संकेत दिसत आहेत. येथे सुरू असणार्या दगड खाणीतील रात्रीच्या ब्लास्टिंगच्या आवाजाने येथील नागरिकांची झोपमोड होत आहे. हवेत धुळीकण पसरून प्रदूषणही जास्त वाढलेले आहे. उन्हाचा तडाखा तर वाढलेलाच आहे. वनराईने नटलेला हा निसर्गरम्य परिसर काही वर्षातच भुईसपाट होणार आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती येथील जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.
पारंपरिक पिकांपेक्षा हमखास नगदी उत्पन्न देणार्या फळपिकांकडे उरण विभागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याची माहिती आंबा बागायतदार महेंद्र मोकल यांनी दिली. फळझाडांच्या माध्यमातून मिळणार्या उत्पन्नाचा स्त्रोत आर्थिक लाभ देणारा ठरत असल्याने गेल्या काही वर्षांपासून फळपीक लागवड क्षेत्र उरण तालुक्यातील चिरनेर भागात विस्तारत आहे. कोकणची माती ही फळ पिकासाठी उत्तम असल्याने पारंपरिक शेतीच्या जोडीला शेतीचे बांध, पडीक माळराने यांच्यावर फळपीक लागवड क्षेत्र वाढविण्याकडे शेतकरी वर्ग प्रयत्नशील आहे. मात्र, दगडखाणींमुळे फळपिकांना धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, वनखात्याने याबाबत योग्य त्या हालचाली सुरू करून निसर्ग वाचविण्याचा प्रयत्न करावा. निसर्ग वाचला तर येथील नागरिकांचे आयुष्यमान वाचेल. नाहीतर निसर्गाच्या कत्तलीमुळे उष्मा वाढून, उष्माघाताने अनेकांचे बळी जातील. पर्यावरण खात्याची जबाबदारी म्हणून या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन, येथील दगड खाणींचे कामकाज कायमचे बंद करावे, असे आवाहन येथील नागरिकांमधून केले जात आहे.