| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीए बंदरातील कंटेनर वाहतुकीवर मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम दिसू लागला आहे. इराण, अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील तणावामुळे 1 मार्चपासून बंदरातील मालवाहतुकीत घट झाली आहे. यापूर्वी दररोज सरासरी सुमारे 23 हजार कंटेनर्सची वाहतूक होत होती. मात्र, सध्या ही संख्या सुमारे 20 हजारांवर आली असून, दररोज सुमारे तीन हजार कंटेनरने घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूकदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, या बंदरातून विशेषतः रमजानच्या काळात आखाती देशांकडे केळी, द्राक्षे, कांदा आणि बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रियेवरही परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे.






