रखडलेल्या समस्यांचा निवडणुकीवर परिणाम?

माथेरानच्या जनतेमध्ये अनुत्साह

। माथेरान । वार्ताहर ।

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ दिसून येत आहे. मागील पाच वर्षांमध्ये जनतेशी एकरूप राहिलेले खासदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळत आहे पण काही ठिकाणी खासदारकीच्या काळामध्ये जनतेशी फटकून वागलेल्या उमेदवारांना मात्र यावेळी पुन्हा निवडून येण्याकरता कसरत करावी लागणार हे निश्‍चित आहे व याचे पडसाद सध्या माथेरानमध्ये सुद्धा पहावयास मिळत आहेत.

मावळ मतदार संघामध्ये माथेरानचा समावेश होतो. मागील पाच वर्षांमध्ये माथेरानचा पर्यटन विकास थांबला आहे. पाच वर्षात येथे पर्यटन पूरक एकही प्रकल्प राबविला गेला नाही. जी काही विकास कामे या काळामध्ये झाले. ती या आधीच्या सरकारने मंजूर केलेली होती नवीन सरकारने माथेरानसाठी कोणत्याही पर्यटन पूरक योजना राबविलेल्या नाहीत. माथेरानकरांच्या माफक अपेक्षा आहेत.

येथे रस्ता, वीज, पाणी सारख्या मूलभूत सुविधा निरंतर सुरू राहाव्यात. परंतु, माथेरानला गरज असलेला पर्यायी रस्ता पाणी दरामध्ये कपात व वीज दारामध्ये कपात या सारखे प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. माथेरानच्या पर्यटनामध्ये महत्त्वाचा असणारा वाहनतळ प्रश्‍न मागील दहा वर्षापासून प्रलंबित आहे. महत्त्वाच्या प्रकल्पास कोणाकडूनही ठोस पाठबळ मिळाले नव्हते. ज्यामुळे येथील जनता दुखावलेली आहे. इतर पर्यटन स्थळांच्या बाबतीत शासनाने दाखवलेला उदारपणाचा हात माथेरानकरांसाठी आखडता घेतला आहे. त्यामुळे माथेरानचे पर्यटन जैसे थे आहे. त्यामुळेच येणार्‍या आगामी निवडणुकीकरता माथेरानमधील मतदारांमध्ये उत्साह नसल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे राज्यांमध्ये सुरू असलेल्या पक्ष फुटीच्या राजकारणाचा मोठा परिणाम येथील पक्षांवर झाला असून नेत्यांकडून कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेता सुरू असलेल्या पक्ष बदलाच्या भूमिकेमुळेही सामान्य कार्यकर्ता निवडणुकीपासून दूर जात असल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीवर विश्‍वास ठेवण्यास येतील जनता तयार नाही, कारण कोणी निवडून आले तरी मतांच्या राजकारणाकरिता माथेरानकरांना वेठीस धरले जाते. हे आता येथील सुज्ञ जनतेला ठाऊक झाले आहे.

Exit mobile version