। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामपंचायतींनी शासनाच्या प्रत्येक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विकासकामांसाठी निधी जास्तीत जास्त मिळवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बुधवारी केले.
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्व. प्रभाकर पाटील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अलिबाग पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सालावकर, गटविस्तार अधिकारी दयाळू राठोड यांच्यासह पंचायत समितीमधील विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
या आढावा सभेत पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, रोजगार हमी योजना, पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग यांच्यासह विविध विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. तसेच सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्या.
सौर ऊर्जा प्रकल्प राबवा
ग्रामपंचायतींनी विजेच्या बिलांची बचत करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प राबवावा, घनकचर्याचे योग्य नियोजन करून, त्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवावेत, मनरेगातंर्गत विविध कामे हाती घ्यावीत, घरकुल योजनांची कामे वेळेत पूर्ण करावीत, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली 100 टक्के करावी, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
गावागावात महिला बचत गट स्थापन करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी प्रयत्न करावेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उदर निर्वाहाचे साधन निर्माण होत आहे. विविध उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान व कर्ज बचतगटांना देण्यात येते. यामुळे महिला स्वावलंबी होतात. तसेच बचत गटांच्या माध्यमातून शासकीय योजना घराघरात पोहचविणे सहज शक्य आहे.
डॉ. किरण पाटील, सीईओ,रायगड जि.प.