धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा

हर हर चांगभले धनगर समाज संस्थेची मागणी


| खोपोली | वार्ताहर |

राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी हर हर चांगभले धनगर समाज संस्थेने खालापूरचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. चौंडी येथे 6 सप्टेंबर पासून यशवंत सेनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला हर हर चांगभले धनगर समाज संस्था खालापूर यांनी जाहीर पाठिंबा देऊन नायब तहसीलदार यांना निवेदन दिले. राज्यात गेल्या 70 वर्षापासून होत असलेली धनगर आरक्षणाची मागणी कुठल्याच राज्यकर्त्यांनी मान्य केली नाही. आजपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. या मागणीसाठी राज्यातून अनेक धनगर समाज मोर्चे, रस्तारोको अशी विविध आंदोलन करत आहे.

चौंडी येथील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे, तरीही सरकारने उपोषण गांभीर्याने घेतलेले नाही. सरकारने जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर खालापुरात धनगर समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा हर हर चांगभले धनगर समाज संस्थेच्या वतीने देण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर समाज बांधव शेखर बंगाले यांनी भंडारा उधळला त्यावेळी त्यांनाही विखे यांच्या कार्यकर्त्यानी मारहाण केली होती. याचाही निषेध या निवेदनात नोंदविण्यात आला. सरकारने चौंडी येथे सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या उपोषणाला भेट देऊन यशवंत सेनेची मागणी मान्य करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. याप्रसंगी हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे खालापूर तालुका अध्यक्ष हरेश ढेबे, उपाध्यक्ष ठकुराम झोरे सचिव चंद्रकांत हिरवे, खजिनदार दत्ता हिरवे, जनार्दन गोरे आदी सह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version