यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा हाती

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

यशश्री शिंदेची हत्या केल्यानंतर आरोपीने लपवलेला मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एका टॉवरखाली हा मोबाईल लपवण्यात आला होता. पण पावसात भिजल्याने तो सुरू होत नाही. त्यामुळे पोलिसांनी तो मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवला आहे. 

उरण येथील तरूणी यशश्री शिंदेची हत्या करून फरार झालेल्या दाऊद मसुद्दीन शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली होती. हत्येनंतर यशश्री शिंदे हिचा मोबाईल गायब करून आरोपीने लपवून ठेवला होता. तपासाअंती सदरचा मोबाईल आरोपीने रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टॅावर खाली ठेवल्याचे पोलीसांना सांगितले. आरोपीने दिलेल्या माहितीनंतर सदर ठिकाणी जावून पोलिसांनी शोधमोहीम केली असता मोबाईल मिळाला. पण मोबाईल पावसात भिजल्याने सुरू होत नाही. त्यामुळे फॅारेन्सिक लॅबला मोबाईल पाठविण्यात येणार आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला सुरा सुध्दा पोलिसांनी हस्तगत केला आहे. गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे हाती लागल्याने आरोपी दाऊद शेखला कडक शिक्षा सुनावण्यासाठी याची मदत होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलवरुन संपर्क होता, अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेखने दिली आहे. मात्र, यशश्रीचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यामुळे पोलिसांकडे दाऊदने कबुली दिल्यानंतरही बक्कळ पुरावा नव्हता. आता यशश्रीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणे आता आणखी सोपे होणार आहे.

Exit mobile version