पीएनपी प्रवासी बोट उद्यापासून होणार सुरु
| अलिबाग | प्रतिनिधी |
मुंबईत जाणारे व मुंबईतून अलिबागला येणाऱ्या प्रवाशांसह पर्यटकांसाठी खुषखबर आहे. पावसामुळे बंद असलेली जल वाहतूक सेवा पुन्हा नव्याने सुरु होणार आहे. पीएनपी कॅटमरन प्रवासी बोट रविवारी (दि. 01) सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती पीएनपीकडून देण्यात आली आहे.
पावसाळ्यामध्ये दोन महिने जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना एसटीतूनच प्रवास करावा लागला. मुंबईत खरेदीसाठी जाणाऱ्या व्यवसायिकांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. तसेच मुंबईतून अलिबागला येणारे व अलिबागहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसह पर्यटकांना जलवाहतुकी अभावी पेण, पनवेल मार्गे तीन ते चार तास प्रवास करावा लागला होता. जलवाहतूक सेवा कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा संपली आहे. गणरायाच्या आगमनाला सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाटी पीएनपी कॅटमरनद्वारे जलवाहतूक सेवा सुरु केली जाणार आहे. एक सप्टेंबरला याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.