महत्वाची बातमी! पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज मेगाब्लॉक

। मुंबई । वृत्तसंस्था ।

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दोन तासांच्या या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवली जाणार आहे.

काल रात्री पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मातीचा ढिगारा कोसळला होता. कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरच ही घटना घडली होती. पावणे नऊ वाजता घडलेल्या घटनेनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू होती. काहीवेळात मातीचा हा ढिगारा बाजूला केल्यावर उर्वरित दोन लेनही सुरू केल्या. चार दिवसानंतर ही तिसरी घटना घडलेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, वाहतूकही सुरळीत करण्यात आली.

दुपारी 2 ते 4 दरम्यान मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली जाणार आहे. जुन्या पुणे-मुंबई महमार्गाने ही वाहतूक मार्गस्थ होईल आणि लोणावळ्याजवळ पुन्हा द्रुतगती मार्गाशी जोडली जाईल. पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरूच राहील. याआधी सोमवारी आणि गुरुवारी असेच विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळी आडोशी बोगद्याजवळची दरड हटविण्यात आली होती.

पुणे-मुंबई द्रुतगतीवर दरड कोसळू नये, म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. मार्गावर दरड कोसळू नयेत, म्हणून डोंगरांच्या कातळकडांना जाळ्यांचं संरक्षण देण्यात आलं आहे. पण या जाळ्या निकृष्ट दर्जाच्या होत्या, असं रविवारी (दि.23) रात्री सिद्ध झालं. आता त्याच ठिकाणी पुन्हा नव्यानं जाळ्या लावल्या जात आहेत. आताच्या या जाळ्या निकृष्ट दर्जाच्या नसाव्यात, अशी अपेक्षा प्रवासी करत आहेत. पुन्हा या निकृष्ट कामाचा फटका सामान्यांना बसू नये, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे.

Exit mobile version