विजय शेकाप व इंडिया आघाडीचाच होणार
| अलिबाग | प्रतिनिधी |
चिंचवली ग्रामपंचायतीमध्ये आता विरोधकांना पराभव समोर दिसू लागला आहे. साम, दाम, दंड, भेद अशी आयुध वापरुन त्याचा काहीच प्रभाव मतदारांवर होत नसल्याने विरोधकांनी अंधश्रध्देचा आधार घेतला आहे. येथील आदिवासीवाडीत शेकापच्या लालबावट्यामध्ये लिंबू, मिरची, हळद-कुंकू गुंडाळण्यात आल्याचा आघोरी प्रकार समोर आला आहे. सुभाष हिलम यांच्या घराशेजारी असलेल्या जागेत हा प्रकार घडला असल्याचे गावंड यांनी सांगितले.
कितीही लिंबू फिरवा….. आता विजय मात्र शेकाप व इंडिया आघाडीचाच होणार आहे. विरोधकांना पराभव दिसत असल्याने असे प्रकार ते करत आहेत. देश चंद्रावर पोचला आहे, तर विरोधक आजही अशा खुळचट, अघोरी प्रकारामध्ये गुरफटले आहेत, अशी टीका शेकापचे स्थानिक नेते राजाराम गावंड यांनी केली.
शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) या इंडिया आघाडीमार्फत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. सर्वच ठिकाणी इंडिया आघाडीचा प्रभाव पहायला मिळत आहेत. इंडिया आघाडीचा धसका विरोधकांनी चांगलाच घेतला आहे. ग्रामीण भागासह शहरांचा विकास शेकापच करु शकतो. हे मतदारांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे सर्वत्रच इंडिया आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अलिबाग तालुक्यातील चिंचवलीमध्ये शेकापचेच वर्चस्व राहीले आहे. या ठिकाणी विरोधकांना चारीमुंड्या चित करण्यासाठी सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शड्डू ठोकला आहे. प्रचारामध्ये उमेदवारांना मतदारांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांना चांगलाच घाम फुटला आहे. विरोधकांना मात्र पराभव स्पष्ट दिसत असल्याने ते अघोरी प्रथांचा आधार घेण्याचा शेवटचा केवीलवाणा प्रयत्न असल्याचे दिसून येते.