अलिबाग तालुक्यात 21 सरपंच तर 111 सदस्य रिंगणात; 61 जणांनी घेतली माघार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमध्ये आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदाच्या 14 तर सदस्यपदासाठीच्या 47 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 21 सरपंच पदाचे तर 111 सदस्यपदाचे उमेदवार उरले असून त्यांच्यामध्ये बहुरंगी निवडणूक रंगणार आहे.

तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी सात उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज सादर केले होते. त्यापैकी आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात पाच उमेदवार उरले आहेत. तसेच सदस्यपदासाठी 23 जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता 21 उमेदवारांचे आव्हान कायम आहे.

तसेच शिरवली ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यानंतर उर्वरित पाच उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तसेच सदस्यपदासाठी दाखल 34 अर्जांपैकी 15 जणांनी आपले अर्ज मागे घेतले त्यानंतर आता उर्वरित 19 उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. वैजाळी ग्रामपंचायतीत थेट सरंपचपदासाठीचे दाखल असलेल्या सहा अर्जांपैकी दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता एका जागेसाठी चौघांमध्ये लढत होणार आहे. त्याचप्रमाणे सदस्यपदांसाठी 33 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सात जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 26 उमेदवारांचे निवडणूक रिंगणात आव्हान कायम असून त्यांच्यात लढत होईल.

या तीन ग्रामपंचायतीमध्ये अनेक जणांची उमेदवारी असल्याने येथे बहुरंगी लढत बघायला मिळणार आहे. तर बोरीस गुंजीस ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोघा उमेदवाराचा अर्ज मागे घेतला गेल्यानंतर दोनच उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याने त्यांच्यात थेट लढत पहायला मिळणार आहे. तसेच सदस्यपदासाठी 22 दाखल अर्जांपैकी 9 जणांनी माघार घेतल्यानंतर एका जागेवर एकच अर्ज आल्याने ती जागा बिनविरोध झाली आहे. तर उर्वरित सहा जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात उभे आहेत.

आक्षी ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्यानंतर तीन उमेदवार तर सदस्यपदांसाठी 28 जणांच्या दाखल अर्जांपैकी 10 जणांनी माघार घेतल्याने 18 उमेदवारांचे आव्हान कायम आहे. मुळे ग्रामपंचायतीमध्ये चार थेट सरपंचपदासाठी दाखल झाले होते त्यापैकी दोघांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता दोन उमेदवारांमध्ये थेट लढत पहायला मिळणार आहे. तर सदस्यपदांसाठी 18 जणांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यापैकी चौघांनी माघार घेतल्यानंतर आता उर्वरित 14 जणांमध्ये लढाई पहायला मिळणार आहे.

Exit mobile version