| महाड | प्रतिनिधी |
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या प्रयत्नाने झालेल्या आंबेत व टोळ पूलांचे भवितव्य अंधारात आले आहे. कालबाह्य झालेले हे पुल नव्याने उभारणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता असल्याने केवळ दुरुस्तीवरच लाखो रुपये खर्च केले जात आहेत. भविष्यात या मार्गावरील दोन्ही जिल्ह्यातील लोकांना याचा फटका बसणार असून, या दोन पुलांच्या उभारणीसाठी लागणारा निधी राज्य सरकार देणार की केंद्र सरकार, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत व टोळ तसेच महाडमधील दादली पुलाची निर्मिती ही तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांनी केली होती. आज आंबेत येथील पुलाला 47 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2017-18 मध्ये हा पुल धोकादायक असल्याने त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र, 2019मध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या बार्जने दिलेल्या धडकेत पुलाचा एक खांब सरकल्याने हा पुल पूर्णपणे धोकादायक झाला होता. अखेर दोन वर्षांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करून 2021 साली वाहतुकीसाठी लोकार्पण करण्यात आला.
त्याचप्रमाणे टोळ व दादली पुलाला देखील 40 वर्षाहून अधिक कार्यकाळ झाला. मात्र, केवळ दादलीपुलाच्या नवीन कामाला मान्यता मिळाली असली तरी आंबेत व टोळ या दोन पूलांच्या नव्या कामाला निधी मंजूर झालेला नाही. पुलांच्या कामासाठी लागणारा करोडो रुपयांचा खर्च राज्य सरकार करणार की केंद्र सरकार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र, त्याबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतरच राज्य सरकार या करिता निधी देते की, केंद्र सरकारकडे बोट दाखवते हा खरा प्रश्न असल्याने दोन जिल्ह्यातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशा प्रकारच चर्चा दोन्ही जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांमध्ये होऊ लागल्या आहेत.






