पी. साईनाथ यांची खंत
देशातील कृषी, प्रसारमाध्यम विषयांवर परखड भाष्य
। सोलापूर । वृत्तसंस्था ।
आंतराराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी, ब्रिटिश काळात बळीराजाची जी अवस्था होती, त्याहीपेक्षा भयावह अवस्था सद्यःस्थितीत कृषिप्रधान देशात असल्याची खंत व्यक्त केली आहे. तसेच प्रसारमाध्यमेही बड्या भांडवलदारांच्या खिशात गेल्यामुळे शेतकर्यांच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पी.साईनाथ यांनी शेतकरी, प्रसारमाध्यमे आदी मुद्यांवर परखड शब्दांत भाष्य केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोकाशी, प्रा. विलास बेत, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ते म्हणाले की, भारत कृषिप्रधान देश असूनही येथील शेतकर्यांना न्यायासाठी सातत्याने झगाडावे लागते. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर झालेले शेतकर्यांचे आंदोलन हे देशातील सर्वाधिक ताकदीचे आणि यशस्वी झालेले आंदोलन आहे. या आंदोलनाची इतिहासात नोंद होईल, अशा शब्दांत त्यांनी किसान लढ्याबाबत गौरवोद्गार काढले आहेत.
तर कृषिउत्पन्न बाजार समित्या म्हणजे शेतकर्यांच्या दृष्टीने काही स्वर्ग नाहीत. त्या सरकारच्या इशार्यावरच चालतात. शेतात प्रत्यक्ष राबणार्या शेतकर्यांची संख्या मोठी आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळाल्यास देशातील अनेक समस्या सुटू शकतात, असे त्यांनी सुचित केले. पण समाजाच्या चुकीच्या मानसिकतेमुळे शेतीत राबणार्या स्त्रियांच्या कष्टाचीही दखल घेतली जात नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सरकारच्या विरोधात झगडण्याची मानसिकता शेतकर्यांना ठेवावी लागणार आहे, असे मत साईनाथ यांनी व्यक्त केले.
याशिवाय सद्यःस्थितीत केंद्र शासनाने चालविलेल्या खाजगीकरण धोरणावर भाष्य करताना ते म्हणाले की, कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रे बाधित होऊन आर्थिकदृष्ट्या नुकसानीत गेली. परंतु याच कोरोनाकाळात अंबानींच्या वैयक्तिक उत्पन्नात दुपटीने वाढ होते. हे कशाचे लक्षण आहे? तर अंबानींनी अनेक माध्यम संस्था विकत घेऊन खिशात घातल्या आहेत. या माध्यम संस्था मालकांशीच इमानी राहणार आणि त्यांचीच री ओढणार, यात नवल नाही. परंतु अशा बड्या भांडवलदारांशी संबंध नसलेल्या माध्यम संस्थाही जाहिरातींच्या लालसेपोटी त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाहीत, याकडेही साईनाथ यांनी लक्ष वेधले.